वेळेचे नियोजन

» रविवार, २ जानेवारी, २०११

हं, तर नवीन वर्षाला सुरुवात झालीय म्हणायची. गेल्या दशकात अशा कित्येक महत्वपूर्ण घटना तुमच्या आयुष्यात घडून गेल्या असतील ज्यांमध्ये तुमचा राहिलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग तुम्ही हयात असेपर्यंत कधीच विसरु शकणार नाहीत. बहुतेकदा अशा घटनांच्या परिणामांचे स्वरुप—प्रचंड आनंद, रंगतंद्रीमय सुखातिरेक, भयानक, पार दुःखाच्या डोहात बुडल्याची जाणीव, भावशून्यता, नैराश्य असे काहीसे असते. अशा गोष्टींबद्दल विचार करताना मग लगेच असा प्रश्न किंबहुना मस्तकी चमकून जातो की या सर्व गोष्टींमागचे कारण तरी काय, का असे अनुभव अनुभवायला मिळतात, कशामुळे? विचार करायला बसले की अनन्य प्रश्न समोर उभे ठाकतात आणि ते तुम्हाला स्वतःला उत्तरे माहित नसताना देखील एकामागोमाग एक अशा प्रकारे मुळ प्रश्नाला लागूनच असलेल्या अतिशय कठिण प्रश्नांचा भडिमार तुमच्यावर करण्यास सुरुवात करतात. हीच बाब माझ्या बाबतीत घडली. नववर्षाचा रम्य स्वागत सोहळा अनुभवण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतोच. आता केवळ काही दिवसांच्या सुट्ट्यानंतर चालू होणारे सेमिस्टर माझ्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे याची पुरती जाणीव मला झालेली आहे, अन् त्याचाच परिणाम म्हणजे गत घटनांपासून, पूर्वी केलेल्या गत कर्मांपासून काही तरी शिकायचे—अशी बनलेली मानसिकता; झाले "मी पणा"चे भान देखील मी विसरत गेलो, निराशेचे सूर माझ्या एकूणच हालचालींवरुन समोरच्याला स्पष्ट दिसत असावेत. ही बाब बहुतेकांनी हेरली, सोमेश दादाने याची दखल घेत मला "रँडी पॉश् " या आजतागायत मला माहित नसलेल्या व्यक्तिबद्दलची व त्यांच्या लेक्चर्सविषयी माहीती पुरविली. सोमेश दादाला तुम्ही [या ] त्याच्या संस्थळावर त्याने अतिशय काळजीपूर्वक व अभ्यासपूर्वक पद्धतीने बनवलेल्या माइंड मॅप्सवरुन बहुधा आधीपासूनच ओळखत असाल.


अवघ्या काही तासांतच मी रँडी पॉश् यांचा चाहता झालो. अगदी साध्या-साध्या घरगुती उदाहरणांचा प्रत्यय देत त्यांनी आजवर लक्षावधी लोकांच्या जीवनात हर्ष रुपी बीजे पेरण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे, पॉश् हे स्वतः संगणक क्षेत्रातील प्रख्यात अभियंते आहेत; त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचे प्रभावी वक्तृत्व व संभाषण कौशल्य—ऐकणाऱ्या रसिक श्रोत्याला हसवत-खेळत ठेऊन मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्याकडे अथांग शक्ती आहे. पॉश् यांच्याबद्दल अधिक माहीती गोळा करीत असताना त्यांचे "टाइम मॅनेजमेंट "वरील लेक्चर पाहण्यात आले, एकूणच एन्जॉय करण्यासारखे आहे ते! या लेक्चरमधील त्यांनी समजावलेले "स्टीफन कॉव्हेचे फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स" मला अधिक भावले. वरील परिच्छेदातील सुरुवातीच्या ओळींत ज्या प्रश्नांचा मी उहापोह केला आहे, त्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे शोधण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन आपल्या हाती लागले आहे, अशी मला पक्की खात्री झाली.

मागे वळून पाहताना...

» बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

मागे वळून पाहताना...
मागे वळून पाहताना...

आत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला "नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्‍यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्याप्रमाणे मनाच्या अदृश्य पटलावर भरधाव वेगाने असंलग्न शृंखलेतील पताक्यांप्रमाणे अवतरायला लागली.

ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्या जीवनात काहीही न म्हणण्यापेक्षा "जैसे थे!" घटनांचा प्रभाव होता, असं माझं अन् माझ्या स्वार्थी मनाचं मत; याबाबतीत दोहोंपैकी का कुणाचं दुमत नाही, तेच उमगत नाहीये, असो. कॅन्टीनमध्ये साजरा केलेला वाढदिवस, त्यानंतर त्याच दिवशी रिजल्ट लागून फर्स्ट इयर क्लिअर केल्याची दूतर्फा आनंद देणारी बातमी; सगळं काही अगदी जसं हवं होतं तसंच घडलं. नंतरच्या काळात बाहेर भटकणं, बागडणं इत्यादी गोष्टी तर आल्याच. आमच्यासारख्या मतलबी लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही मिळणं वा तसं काही घडणं म्हणजे खूप अलौकिक बाब असते, हे सांगायला नको!

त्याग

» बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

ही वाट दूर जाते...

     पूर्वी त्याला सहजीवनाची तर सोडाच पण अगदी आप्तांमधल्या जन्मजात जुळलेल्या नात्यांची सुद्धा जाणीव नव्हती किंवा त्या नात्यांमध्ये स्वतःला गुंफून घेण्यासही तो कधी तयार होत नसे. "लाइफ इज सोऽ लॉन्ग..." अशी त्याची जीवनाबद्दलची भावना बनलेली होती. कौटुंबिक नि नैतिक हितसंबंध जपणे देखील त्याला जड जाई, अशा वेळी त्याची नेहमी पलायनाचीच भूमिका त्याच्या समोरच्याच्या नजरेत येत असावी कदाचित... त्याला या गोष्टीची जाणीव होती, पण मुळी ती गोष्टच आपल्यात कमतरता किंवा कमकुवतता (वीक पॉइन्ट) असावी, असे तो मनात आणून त्यावर पुढील वैचारिक मंथन करण्यासाठीची दरवाजे एकार्थी बंद करुन टाकत असे. असं असूनदेखील त्याने त्याच्या भवितव्याची स्वप्ने मात्र अशी उत्तुंग अन् अफाट रंगवली होती, जी इतरांनाच काय, पण स्वतः त्यालासुद्धा अविश्वसनीयच वाटायची. या काळात—निखळ मैत्रीची, एकमेकांत स्वैर गुंफलेल्या नाजूक नात्यांची किंवा एखाद्या प्रेमळ साथीदाराची मात्र त्याने कधीच स्वप्ने बघितली नाहीत वा त्याच्या नेहमी पडणार्‍या स्वप्नांत या गोष्टींना फारसे महत्वाचे स्थान नव्हतेच! अशी ही संकुचित भावना बाळगण्याचा त्याचा अट्टहास मनापासून मुळीच नव्हता, त्याने असं जगणं स्वतःहून अंगिकारलं देखील नव्हतं—मुळात त्याला या व अशा कित्येक गोष्टींची पुरती ओळख देखील झालेली नव्हती.

विचित्र स्वप्नानुभव

» मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

     किती अफाट हे वाळवंट... जिकडे नजर टाकावी, तिकडे वाळूचे उंचच-उंच डोंगर... गेल्या दोन-तीन तासांपासून मी सलग, कुठेही न वळता चालतोय... वर तळपता सूर्य, तहानेने अगदी व्याकूळ झालोय... व्याकूळ म्हणजे कंठ एखाद्या दुष्काळग्रस्त झर्‍याप्रमाणे कोरडा पडलाय, अगदी दयनीय अवस्था... ओसाड, पडीक, वाट नसलेल्या वाळवंटामधून वाट काढत मी चालतोच आहे. मी इथे का, कसा, व नेमका कशासाठी आलो—सगळे प्रश्न निरुत्तरित, माझे मलाच उत्तर मिळत नाहिये... आता माझ्यापुढे फक्त एकच ध्येय उरलंय, ते म्हणजे या अत्यंत उष्ण अन् रेताड नरकातून कसल्याही परिस्थितीचा सामना करीत बाहेर पडायचे म्हणजे पडायचेच... मला वाळवंटात असणार्‍या नंदनवनाबद्दल म्हणजेच ओअॅसिस बद्दल माहिती आहे, म्हणजे मी त्याबाबत कुठेतरी, कुणाकडूनतरी ऐकलंय... त्याच्याच शोधार्थ मी आता पायपीट करीत, सूर्य मावळतीच्या दिशेने वाळूचे एक-एक डोंगर पादाक्रांत करीत चालतोच आहे. एव्हाना प्रचंड तळपणारा सूर्य आता मावळतीच्या दिशेने जात असतांना फारच विलोभनीय दिसतोय, ना का माझ्या मनात त्याच्याबाबत तिटकारा व्यक्त होईल असा भाव निर्माण झाला असला तरी... सृष्टीचे असे हे भावविभोर करुन टाकणारे सालस, मनमोहक दृश्य पाहण्याचा योग सगळ्यांच्याच नशिबात नसतो, त्यामुळे त्या सूर्याबाबत मी आज बाळगत असलेला द्वेष टाकून दिला. थंडी वाढत चाललीय... मनात काहीतरी विचार चालू आहे, कसला ते मात्र माहिती नाही... डोक्यात असेच काही-बाही विचारांचे चक्र चालू असतांनाच मला कसलातरी पूर्वपरिचित आवाज अगदी पुसटश्या स्वरुपात ऐकायला आला. पहिल्या क्षणी तरी तो केवळ घायाळ झालेला मनाचा भ्रम असावा, असे मानून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण जसजसे मी समोर जाऊ लागलोय, तसतसा तो आवाज अधिकच स्पष्ट, सुस्पष्ट होत येतोय... अरेच्चाऽऽ, देव पावला म्हणायचा... हा गाडीचाच आवाज, त्यातील जोडपं हसत-खिदळत माझ्याच दिशेने येतंय... एरवी त्यांच माझ्याकडे लक्ष नव्हतं, मी अगदी मधोमध, त्यांच्याच वाटेत थांबलेलो... जर त्यांचं माझ्याकडे अजुनही लक्ष गेलं नसेल, तर मी नक्कीच यांच्याच गाडीखाली चिरडला जाईल, हा विचार डोक्यात एकाएकी चमकून गेला अन् माझा तर थरकापच उडाला... मी संपुर्ण शक्तिनीशी जोरात किंचाळलो... माझं नशीबच बलवत्तर म्हणावं लागेल... अवघ्या काही फुटांवर असतांना माझा कर्कश आवाज ऐकून त्यांनी गाडी लागलीच थांबवली... उष्णता, भूक, तहान, थंडी इत्यादींमुळे माझ्या जीर्ण झालेल्या शरीरयष्टीकडे बघून त्यांना माझ्याबाबत अंदाज बांधायला जास्त वेळ लागला नसावा... त्या जोडप्याने त्यांच्याकडील पाणी असलेली बाटली घेऊन ते खाली उतरणार... नि एवढ्यात... माझ्या पायाला काही वेळेपासून काहीतरी हालचाल मला जाणवत होती, पण आता आपण या भकास व निर्मणुष्य वाळवंटातून सुखरूप वाचणार या आनंदात मी एवढा बूडून गेलो होतो की त्या हालचालीकडेदेखील मी पुर्णतः दुर्लक्ष केले होते. ते जोडपे गाडीतून खाली उतरते नि उतरते...
Vishal Telangre