किती अफाट हे वाळवंट... जिकडे नजर टाकावी, तिकडे वाळूचे उंचच-उंच डोंगर... गेल्या दोन-तीन तासांपासून मी सलग, कुठेही न वळता चालतोय... वर तळपता सूर्य, तहानेने अगदी व्याकूळ झालोय... व्याकूळ म्हणजे कंठ एखाद्या दुष्काळग्रस्त झर्याप्रमाणे कोरडा पडलाय, अगदी दयनीय अवस्था... ओसाड, पडीक, वाट नसलेल्या वाळवंटामधून वाट काढत मी चालतोच आहे. मी इथे का, कसा, व नेमका कशासाठी आलो—सगळे प्रश्न निरुत्तरित, माझे मलाच उत्तर मिळत नाहिये... आता माझ्यापुढे फक्त एकच ध्येय उरलंय, ते म्हणजे या अत्यंत उष्ण अन् रेताड नरकातून कसल्याही परिस्थितीचा सामना करीत बाहेर पडायचे म्हणजे पडायचेच... मला वाळवंटात असणार्या नंदनवनाबद्दल म्हणजेच ओअॅसिस बद्दल माहिती आहे, म्हणजे मी त्याबाबत कुठेतरी, कुणाकडूनतरी ऐकलंय... त्याच्याच शोधार्थ मी आता पायपीट करीत, सूर्य मावळतीच्या दिशेने वाळूचे एक-एक डोंगर पादाक्रांत करीत चालतोच आहे. एव्हाना प्रचंड तळपणारा सूर्य आता मावळतीच्या दिशेने जात असतांना फारच विलोभनीय दिसतोय, ना का माझ्या मनात त्याच्याबाबत तिटकारा व्यक्त होईल असा भाव निर्माण झाला असला तरी... सृष्टीचे असे हे भावविभोर करुन टाकणारे सालस, मनमोहक दृश्य पाहण्याचा योग सगळ्यांच्याच नशिबात नसतो, त्यामुळे त्या सूर्याबाबत मी आज बाळगत असलेला द्वेष टाकून दिला. थंडी वाढत चाललीय... मनात काहीतरी विचार चालू आहे, कसला ते मात्र माहिती नाही... डोक्यात असेच काही-बाही विचारांचे चक्र चालू असतांनाच मला कसलातरी पूर्वपरिचित आवाज अगदी पुसटश्या स्वरुपात ऐकायला आला. पहिल्या क्षणी तरी तो केवळ घायाळ झालेला मनाचा भ्रम असावा, असे मानून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण जसजसे मी समोर जाऊ लागलोय, तसतसा तो आवाज अधिकच स्पष्ट, सुस्पष्ट होत येतोय... अरेच्चाऽऽ, देव पावला म्हणायचा... हा गाडीचाच आवाज, त्यातील जोडपं हसत-खिदळत माझ्याच दिशेने येतंय... एरवी त्यांच माझ्याकडे लक्ष नव्हतं, मी अगदी मधोमध, त्यांच्याच वाटेत थांबलेलो... जर त्यांचं माझ्याकडे अजुनही लक्ष गेलं नसेल, तर मी नक्कीच यांच्याच गाडीखाली चिरडला जाईल, हा विचार डोक्यात एकाएकी चमकून गेला अन् माझा तर थरकापच उडाला... मी संपुर्ण शक्तिनीशी जोरात किंचाळलो... माझं नशीबच बलवत्तर म्हणावं लागेल... अवघ्या काही फुटांवर असतांना माझा कर्कश आवाज ऐकून त्यांनी गाडी लागलीच थांबवली... उष्णता, भूक, तहान, थंडी इत्यादींमुळे माझ्या जीर्ण झालेल्या शरीरयष्टीकडे बघून त्यांना माझ्याबाबत अंदाज बांधायला जास्त वेळ लागला नसावा... त्या जोडप्याने त्यांच्याकडील पाणी असलेली बाटली घेऊन ते खाली उतरणार... नि एवढ्यात... माझ्या पायाला काही वेळेपासून काहीतरी हालचाल मला जाणवत होती, पण आता आपण या भकास व निर्मणुष्य वाळवंटातून सुखरूप वाचणार या आनंदात मी एवढा बूडून गेलो होतो की त्या हालचालीकडेदेखील मी पुर्णतः दुर्लक्ष केले होते. ते जोडपे गाडीतून खाली उतरते नि उतरते...