अशीही एक लव्ह स्टोरी - भाग ३

» मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

अशीही एक लव्ह स्टोरी - भाग २ पासून पुढे...

    दुसरा दिवस उजाडण्याअगोदरच पहाटेच्या काळोखात सर्वांच्या घरी वातावरण जरी नेहमीप्रमाणे शांत असलं तरी ही मित्रमंडळी स्वप्नांच्या निराळ्याचा दुनियेत धुमाकूळ घालण्यात व्यस्त होती. जरी आधीच ठरलेलं असलं तरी निव्वळ औपचारिकता म्हणून आणि तयारीमध्ये कसलीही कसर राहू नये यादृष्टीने सकाळी ७ च्या सुमारास राहूलने सर्वांना ठराविक जागेवर ज्याने-त्याने थांबावं, अशी सुचना देणारा संदेश मोबाइलवरुन सर्व ग्रुप-मेंबर्सना पाठवला. राहूलच्या गाडीवर असणारा ड्रायव्हर त्याच्या अगदी जवळचा नि जिव्हाळ्याचा, तो त्यांना काका असे आदरात्मकरीत्या संबोधायचा. ड्रायव्हरला राहूलने अगोदरच त्याच्या फ्रेंड-सर्कल मधील मित्रांची माहिती दिलेली होती.  सर्व तयारी आटोपल्यावर वेळेचा व्यवस्थित अंदाज घेत राहूलने घरुन गाडी सुमेधाच्या घराच्या दिशेने वळवली... पुर्वनियोजीत वेळेनुसार सुमेधा तिच्या घरापासून जरा लांब अंतरावर ठराविक ठिकाणी थांबलेली होती. तीला तेथून गाडीत बसवून नंतर अजय, हर्षद, राजश्री, अनिता, अंकित, कावेरी, निशा या सर्वांना वेळेवर पोहोचून गाडीत घेतले. सर्वजण अगदी खूष व आनंदाने अतिशय भारावलेले होते. निशाकडे गाडी सर्वात शेवटी पोहोचली, तसं ते ठरलेलंच होतं... कारण तीने दोन भले-मोठाले डबे भरुन खाण्याचे पदार्थ घेतले होते, ती पहाटेपासूनच ते बनवण्यात व्यस्त होती तशी... गाडी जशी शहराच्या बाहेर जाणार्‍या चौपदरी हायवेला लागली, तसा ड्रायव्हरने ताशी वेग वाढवला, सुमारे ताशी ५०-६० मैल असा असावा. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरील रहदारी दिवसा असणार्‍या प्रचंड गर्दीच्या तुलनेने अतिशय विरळ असल्याने गाडी अधिक जलद गतीने हाकण्यास कसलीच अडचण नव्हती, शिवाय रस्ताही अतिशय गुळगुळीत व सरळ होता. मुली तर असा पहिल्यांदाच प्रवास करीत होत्या नि एवढ्या जलद जाणार्‍या प्रवासाची बहुतेकींना सवय देखी नव्हती, किंचीत घाबरल्याच होत्या काहीजणी... राहूलने त्यांच्या मनावरील द्विधा भाव लागोलाग हेरुन ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करण्यास सांगितले. आज यांच्यावर हवामान मेहेरबान दिसत होते, कारण सकाळचे साडे-आठ वाजूनदेखील सुर्याचा पत्ताच नव्हता, जरी दिवस थंडीचे असले तरी हिवाळ्यात देखील ऊन्हाचा भयंकर कहर आता लोकांना सहन करावाच लागत होता, परिणामी गरमीमुळे होणारी दगदग इत्यादी गोष्टी आल्याच... गाडी निश्चित ठिकाणाकडे जाणारी वाट पादाक्रांत करीत होती, तसे आतमध्ये बसलेल्या या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांना, गलबलाटाला, किंकाळ्यांना उधाण वाढत गेले... सर्वांना ते हिलस्टेशन कधी एकदाचे येते याची उत्सुकता लागलेली होती. तासाभरात गाडी तेथे पोहोचली...    वार्‍याचे झाडांच्या पानांशी चाललेले हितगूज आणि पक्ष्यांची मधूर किलबिल वगळता संपूर्ण परिसरात नीरव शांतता पसरलेली होती. त्या डोंगराच्या लगतच्या रस्त्यावरुन आपसुकच एखादं वाहन फिरकत होतं, त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा हर्ष प्रत्येकालाच होत होता. सकाळचे फक्त दहा वाजले असल्याकारणाने अजुनपर्यंत तरी तेथे फिरण्यासाठी कोणीच आलेले नव्हते, सहसा तेथे दूपारच्या नंतरच लोकांचं येणं चालू होतं. डोंगर चढण्याकरीता फार कठिण म्हणता येईल असा नव्हता पण तेवढा सोपादेखील मुळीच नव्हता. कित्येक ठिकाणी डोंगर चढतांना भल्या-भल्यांच्या नाकी नऊ येतील, असे अडथळे वाटेत बनलेले होते. एकूणच ही ट्रिप एक मस्त ट्रेक होणार, या भावनेनेच अनेकांचे चेहरे खुलले होते, मात्र अनिताने जेव्हा डोंगराकडे पाहिले तेव्हा तीच्या तोंडून चक्क 'बाप्पऽऽरे' असे आश्चर्योद्गार नकळत बाहेर पडले. तीने यापूर्वी कधीच अशा रांगड्या डोंगरांची चढाई केली नव्हती, त्यामुळे साहजिकच ती प्रथम घाबरलीच... सर्वांनी समजूत घातल्यावर तशी ती लगेच तयार देखील झाली. जेमतेच व गरजेपुरतेच सामान म्हणजे डबे, पाण्याच्या बॉटल्स इत्यादी काही बॅग्ज मध्ये भरून त्या मुलांकडे सुपूर्द करण्यात आल्या. गाडी व्यवस्थित पार्क करुन ड्रायव्हरने ते सर्वजण फिरून येईपर्यंत मस्त झोप काढण्याचा निर्णय घेतला. डोंगर चढण्यास साधारणतः पाऊण तास लागत असे, पण आता मुली सोबत असल्यामुळे हे वेळापत्रक बदलू शकणार होते. अंकित धावतच डोंगर चढण्यासाठी असलेल्या पाऊलवाटेकडे गेला, त्याला ट्रेकिंगची फार आवड... पण सर्वांनी सोबतच रहावं हा राहूलचा हट्ट होता, अखेर राहूलने समजावल्यावर अंकितला त्याची आगेकूच मोहिम आवरती घ्यावी लागली.

    सर्व मुली आता पुढे चढत होत्या, व मुले त्यांच्या मागोमाग... पण अंकित फार आग्रही, तो अजुनही सर्वांच्या पुढेच होता, हं मुलींना वेळोवेळी चढतांना तो त्यांची मदत देखील करत होता तसा... सलग पंधरा मिनिटांपासून ते सर्वजण डोंगर चढीत होते आणि अचानक... अनिता एका ठिकाणी तोल जाऊन जागीच खाली पडली. राहूल धावतच तीच्यापाशी पोहोचला व त्याने त्याच्याच जवळ असलेल्या बॅगमधून प्रथमोपचार किट उघडून त्यातून निर्जूंतीकरणासाठी असलेली कुपी आणि बॅंडेज पट्ट्या काढल्या. बाजूलाच असणार्‍या चुनखडीच्या ओबडधाबड खडकावर घसरुन पडल्यामुळे तीचा उजवा तळहात थोडाफार खरचटला होता... जखम फार काही मोठी नव्हती, पण राहूलने ती जखम व्यवस्थित साफ करुन तेथे बॅंडेज पट्टी बांधली. भाग्याचीच गोष्ट, डोंगराच्या पायथ्याशी असतांनाच ही घटना घडली, अन् त्यात अनिताला जास्त इजादेखील झाली नाही. अनिताला त्रास जरी होत असला तरी ती अद्याप विव्हळत नव्हती. सर्वांनी तीला खाली जाऊन आराम करण्याचे सांगितले, पण तीने ते ऐकले नाही, त्यांच्यासोबतच डोंगर चढण्याचा तीने निर्णय पक्का केला. आता मात्र राहूल तीच्या समवेत होता, तीचा हात घट्ट धरुन तो तीच्यासोबत डोंगर चढत होता. सगळेजण अखेर डोंगरावर पोहोचले, अद्याप राहूल, अनिता व हर्षद चढतच होते. हर्षदने राहूलला त्याच्याशी त्याला काहीतरी वैयक्तिक बोलायचे आहे असं कसलातरी संकेत देऊन थांबण्यास सांगितलं... डोंगराची चढाई संपली तशी अनिता तेथे आधीच पोहोचलेल्या मित्र-मैत्रिणींकडे जाण्यास निघाली. अनिता जाती आहे, हे पाहून तेथेच, थोडं खाली, राहूल व हर्षद थांबले.


(क्रमश:)3 प्रतिक्रिया:

Amrita म्हणाले...

nice marathi site you have here! :)
pooja म्हणाले...

anita pahilyaach bhetit rahulchyaa premaat padte he patat naahi.ti phakt tyaala wargaat nawaane olkhat hoti naa?
anyways, netsurfing kartaana ha blog wacnaat aala,story awadali.pudchyaa bhaagaachi waat paahte aahe.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@ पूजा,

पण जो प्रसंग त्यांच्यासोबत घडला होता, त्या अनुषंगाने तरी त्यांच्यात अचानक जवळीक निर्माण झाली होती, हे आपणास कळाले असेलच... शेवटी प्रेम कधी, कुठे, केव्हा, कुणासोबत होईल याबाबत प्रेडिक्शन करणं तरी खुप अवघड आहे...

आणि महत्वाची बाब म्हणजे हा माझा कथा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. ;)

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre