अशीही एक लव्ह स्टोरी - भाग ३

» मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

अशीही एक लव्ह स्टोरी - भाग २ पासून पुढे...

    दुसरा दिवस उजाडण्याअगोदरच पहाटेच्या काळोखात सर्वांच्या घरी वातावरण जरी नेहमीप्रमाणे शांत असलं तरी ही मित्रमंडळी स्वप्नांच्या निराळ्याचा दुनियेत धुमाकूळ घालण्यात व्यस्त होती. जरी आधीच ठरलेलं असलं तरी निव्वळ औपचारिकता म्हणून आणि तयारीमध्ये कसलीही कसर राहू नये यादृष्टीने सकाळी ७ च्या सुमारास राहूलने सर्वांना ठराविक जागेवर ज्याने-त्याने थांबावं, अशी सुचना देणारा संदेश मोबाइलवरुन सर्व ग्रुप-मेंबर्सना पाठवला. राहूलच्या गाडीवर असणारा ड्रायव्हर त्याच्या अगदी जवळचा नि जिव्हाळ्याचा, तो त्यांना काका असे आदरात्मकरीत्या संबोधायचा. ड्रायव्हरला राहूलने अगोदरच त्याच्या फ्रेंड-सर्कल मधील मित्रांची माहिती दिलेली होती.  सर्व तयारी आटोपल्यावर वेळेचा व्यवस्थित अंदाज घेत राहूलने घरुन गाडी सुमेधाच्या घराच्या दिशेने वळवली... पुर्वनियोजीत वेळेनुसार सुमेधा तिच्या घरापासून जरा लांब अंतरावर ठराविक ठिकाणी थांबलेली होती. तीला तेथून गाडीत बसवून नंतर अजय, हर्षद, राजश्री, अनिता, अंकित, कावेरी, निशा या सर्वांना वेळेवर पोहोचून गाडीत घेतले. सर्वजण अगदी खूष व आनंदाने अतिशय भारावलेले होते. निशाकडे गाडी सर्वात शेवटी पोहोचली, तसं ते ठरलेलंच होतं... कारण तीने दोन भले-मोठाले डबे भरुन खाण्याचे पदार्थ घेतले होते, ती पहाटेपासूनच ते बनवण्यात व्यस्त होती तशी... गाडी जशी शहराच्या बाहेर जाणार्‍या चौपदरी हायवेला लागली, तसा ड्रायव्हरने ताशी वेग वाढवला, सुमारे ताशी ५०-६० मैल असा असावा. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरील रहदारी दिवसा असणार्‍या प्रचंड गर्दीच्या तुलनेने अतिशय विरळ असल्याने गाडी अधिक जलद गतीने हाकण्यास कसलीच अडचण नव्हती, शिवाय रस्ताही अतिशय गुळगुळीत व सरळ होता. मुली तर असा पहिल्यांदाच प्रवास करीत होत्या नि एवढ्या जलद जाणार्‍या प्रवासाची बहुतेकींना सवय देखी नव्हती, किंचीत घाबरल्याच होत्या काहीजणी... राहूलने त्यांच्या मनावरील द्विधा भाव लागोलाग हेरुन ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करण्यास सांगितले. आज यांच्यावर हवामान मेहेरबान दिसत होते, कारण सकाळचे साडे-आठ वाजूनदेखील सुर्याचा पत्ताच नव्हता, जरी दिवस थंडीचे असले तरी हिवाळ्यात देखील ऊन्हाचा भयंकर कहर आता लोकांना सहन करावाच लागत होता, परिणामी गरमीमुळे होणारी दगदग इत्यादी गोष्टी आल्याच... गाडी निश्चित ठिकाणाकडे जाणारी वाट पादाक्रांत करीत होती, तसे आतमध्ये बसलेल्या या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांना, गलबलाटाला, किंकाळ्यांना उधाण वाढत गेले... सर्वांना ते हिलस्टेशन कधी एकदाचे येते याची उत्सुकता लागलेली होती. तासाभरात गाडी तेथे पोहोचली...

अशीही एक लव्ह स्टोरी - भाग २

» सोमवार, २० सप्टेंबर, २०१०

अशीही एक लव्ह स्टोरी - भाग १ पासून पुढे...

    गेल्या काही वेळापासून सुसाट्याने वाहत असलेल्या वार्‍याच्यासोबत व ढगांच्या गडगडाटांसोबत अखेर मोसमातील पहिला-वहिला पाऊस सुरु झाला. रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या त्या कट्ट्यावर, जेथे राहूल अन् अनिता बसलेले होते, तेथे पावसापासून बचावासाठी काही आच्छादनाची सुविधा नव्हतीच, त्यामुळे त्यांना तेथून एखाद्या सुरक्षित जागी जाणे भाग होते. आधीच आक्राळ-विक्राळ थेंबांच्या सरींसह पाऊस सुरु झाला होता, अन् त्यात वीजांचा कडकडाटसुद्धा चालूच होता. राहूलचे बोलणे मध्येच तोडत अनिताने स्वतः उभं राहू त्याचा हात धरुन त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. राहूल आपल्या धूंदीत होता, त्याला पहिल्या क्षणी तर कळालेच नाही की अनिता अशी काय करती आहे ते... पण नंतर जेव्हा ओल्या-चिंब भिजलेल्या अनिताकडे त्याने पाहिले तेव्हा कुठे त्याला जाणवले की पाऊस सुरु झाला आहे... :)  पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर अनिता खचली नाही, ती त्याला उठविण्याचे प्रयत्न करीतच होती. एव्हाना राहूलच्या ध्यानात आलं होतं की अनिता नेमकी काय करण्याचा प्रयत्न करते आहे ते... तसा तो स्वतःदेखील उठला असता, पण त्याने तसे केले नाही. अनिताने त्याचा हात आपल्या दोन्ही नाजूक तळहातांनी घट्ट धरून शक्य तेवढ्या ताकदीनिशी पुन्हा एकदा आपल्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र राहूल तीने ओढल्याबरोबर उठून उभा राहिला अन् लगेच तीलादेखील आपल्याकडे ओढले... शेवटी तो शरीरयष्टीने तसा धष्टपुष्ट होताच, आणि अनितासारखी नाजूक मुलगी म्हणजे त्याच्या एका हाताचाच खेळ...! असं आकस्मिक ओढलं गेल्याने ती थेट त्याच्या कुशीत जाऊन विराजली. तिचे कपाळ त्याच्या छातीवर आदळले गेले, हं पण दोघांनाही त्याच्या वेदना मात्र जाणवल्या नाहीत. कसलाही प्रतिकार न करता तीने त्याच्या छातीवर तीच्या गालांचा हळूवार दाब देऊन दोन्ही हातांनी त्याला घट्ट मिठी मारली... ती काही बोलणार, एवढ्यातच राहूलने तीच्या बोलण्याला न जुमानता त्याचं बोलणं चालू केलं,

    "काय गं... भिती वाटतीय का पावसाची... घाबरली तर नाहीस ना तू?" तो तीच्या डोक्यांवरील भिजलेल्या केसांवर तीला त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्याची दाढ हनुवटी ठेऊन पुटपुटत होता.   

अशीही एक लव्ह स्टोरी - भाग १

» गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

कथालेखन आणि त्यात प्रेमकथेसारख्या अत्यंत अवघड विषयाशी निगडित लेखन करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न...! असो... बर्‍याच विषयांशी संबंधित लेखन तर मी नेहमी करतो, पण त्याला पुर्णत्वास नेणं म्हणजे जीवावर येण्यासारखं काम... बघूयात, ह्या कथेचा शेवट तरी व्यवस्थित होतो का ते... शिवाय बर्‍याच... नाही, फारच दिवसांनंतर ब्लॉगवर काही लिखान करण्याचा आज योग आलाय, हीदेखील चांगली गोष्ट म्हणावी लागेल, नाहीतरी माझ्या कित्येक ब्लॉगर-मित्रांनी विशल्याच्या "सुरूवात"चा शेवट झाला की काय, अशी शोकांतिका (वा अफवा म्हणा!) गेल्या काही दिवसांपासून पसरवण्यास सुरूवात देखील केलेली होती... त्यांच्यासाठी मी जीवंत असल्याची ही पोच-पावती! (राग नका येवू देऊ हो!)  ;)


[डिस्क्लेमर: ही एकूणच कथा, यातील पात्रे, पात्रांची नावे, ठिकाणे, प्रसंग इत्यादी सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. जर तुम्हाला कुठेही तुमच्या आयुष्यातील घटनांशी मिळते-जुळते प्रसंग आढळले, तर तो निव्वळ योगा-योग समजावा.]


----

"तुझ्या डोळ्यांत मला आभाळ दिसतं... तू असतेस तेव्हा मला कसं अगदी तुझ्या प्रितीच्या गार तुषार-सरींखाली मनसोक्त भिजल्यासारखं वाटतं... पण तू जेव्हा नसतेस ना जवळ, तेव्हा मात्र मी अगतिक होतो, कासावीस होतो... मला तुझ्याशिवाय क्षणभरही राहावत नाही प्रिये... हंऽऽ खरंच राहावत नाही गं..." राहूल अत्यंत भावविभोर होऊन स्वप्नरंजित शब्दांत काव्यमय पद्धतीने त्याच्या मनातले भाव अनिताच्या कानी ऐकवत होता.

    वेळ संध्येची... रस्त्याच्या बाजूला असलेल्या कट्ट्यावर ती दोघं बसलेली होती. रस्त्याचे जरी डांबरीकरण झाले असले तरी तो शहराबाहेर अंदाजे १५ किमी दूर असलेल्या एका खाजगी शाळेला मुख्य रस्त्याशी जोडणारा जोडरस्ता होता. शाळेला हल्ली सुट्ट्या असल्याने राहूल अन् अनिताला मनमुराद अशी ती जागा होती... क्वचितच कोणी फिरकत होतं तिकडे, त्यामुळे बरेच दिवसांनंतर भेटीसाठी आसुसलेल्या या जोडप्याला आज एकमेकांस कडकडून भेटण्याची इच्छा न झाली तरच नवल... पावसाळ्याचे दिवस असल्याने आभाळ भरगच्च अशा काळ्याकुट्ट ढगांनी सर्वत्र भरलेले होते. गेल्या अर्ध्या तासापासून अगोदर वाहणारा मंद वारा आता जरा आणखी सुसाट्याने वाहत होता. ह्या वर्षीचा तो पहिलाच पाऊस होता. अगोदरच २ महिने उलटून गेलेले तरीही पावसाची नुसती चाहूल देखील नव्हती, पण आज मात्र ढगांचा गलबलाट अन् वीजांचा एकसंध कडकडाट ऐकून तहानलेली धरणी निश्चितच सुखावली असेल...

Vishal Telangre