अशीही एक लव्ह स्टोरी - भाग २

» सोमवार, २० सप्टेंबर, २०१०

अशीही एक लव्ह स्टोरी - भाग १ पासून पुढे...

    गेल्या काही वेळापासून सुसाट्याने वाहत असलेल्या वार्‍याच्यासोबत व ढगांच्या गडगडाटांसोबत अखेर मोसमातील पहिला-वहिला पाऊस सुरु झाला. रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या त्या कट्ट्यावर, जेथे राहूल अन् अनिता बसलेले होते, तेथे पावसापासून बचावासाठी काही आच्छादनाची सुविधा नव्हतीच, त्यामुळे त्यांना तेथून एखाद्या सुरक्षित जागी जाणे भाग होते. आधीच आक्राळ-विक्राळ थेंबांच्या सरींसह पाऊस सुरु झाला होता, अन् त्यात वीजांचा कडकडाटसुद्धा चालूच होता. राहूलचे बोलणे मध्येच तोडत अनिताने स्वतः उभं राहू त्याचा हात धरुन त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. राहूल आपल्या धूंदीत होता, त्याला पहिल्या क्षणी तर कळालेच नाही की अनिता अशी काय करती आहे ते... पण नंतर जेव्हा ओल्या-चिंब भिजलेल्या अनिताकडे त्याने पाहिले तेव्हा कुठे त्याला जाणवले की पाऊस सुरु झाला आहे... :)  पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर अनिता खचली नाही, ती त्याला उठविण्याचे प्रयत्न करीतच होती. एव्हाना राहूलच्या ध्यानात आलं होतं की अनिता नेमकी काय करण्याचा प्रयत्न करते आहे ते... तसा तो स्वतःदेखील उठला असता, पण त्याने तसे केले नाही. अनिताने त्याचा हात आपल्या दोन्ही नाजूक तळहातांनी घट्ट धरून शक्य तेवढ्या ताकदीनिशी पुन्हा एकदा आपल्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र राहूल तीने ओढल्याबरोबर उठून उभा राहिला अन् लगेच तीलादेखील आपल्याकडे ओढले... शेवटी तो शरीरयष्टीने तसा धष्टपुष्ट होताच, आणि अनितासारखी नाजूक मुलगी म्हणजे त्याच्या एका हाताचाच खेळ...! असं आकस्मिक ओढलं गेल्याने ती थेट त्याच्या कुशीत जाऊन विराजली. तिचे कपाळ त्याच्या छातीवर आदळले गेले, हं पण दोघांनाही त्याच्या वेदना मात्र जाणवल्या नाहीत. कसलाही प्रतिकार न करता तीने त्याच्या छातीवर तीच्या गालांचा हळूवार दाब देऊन दोन्ही हातांनी त्याला घट्ट मिठी मारली... ती काही बोलणार, एवढ्यातच राहूलने तीच्या बोलण्याला न जुमानता त्याचं बोलणं चालू केलं,

    "काय गं... भिती वाटतीय का पावसाची... घाबरली तर नाहीस ना तू?" तो तीच्या डोक्यांवरील भिजलेल्या केसांवर तीला त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्याची दाढ हनुवटी ठेऊन पुटपुटत होता.   

    "नाही रे... भिती कसली, पावसा‍ऽची... छेऽऽ रे... आणि आता तर तुझ्या कुशीत असताना कशाची म्हणजे कश्शाऽऽचीच भिती नाही वाटत मला..." अनिताने अजुन त्याला दोन्ही हातांनी घट्ट आवळण्याचा प्रयत्न केला.

    "रिअलि?" तो तिच्या चेहर्‍यावरुन ओघळणार्‍या थेंबांना पुसत अन् तिच्या केसांची बट सावरत म्हणाला.

    "अरे हो रे बाबा... पण आज पावसात तुफान वारा वाहतो आहे, त्यामुळे खूप थंडी वाजतीय आता..." तीने त्याच्या छातीत आपला संपूर्ण चेहरा लपविण्याचा प्रयत्न चालू ठेवला.

    "ओह्ह माय बॅडलक, आधीच सांगायचं ना... तसं माझ्या कुशीत तुला खूप ऊब मिळत असेलच नाही...?" आता त्याने देखील तीला दोन्ही हातांनी मिठी मारुन स्वतःकडे आणखी ओढून घेतली.

    " हो रे राजा... मी तर मरेपर्यंत तुझ्या कुशीत अशीच निपचित राहण्यास तयार आहे, पण मला तुझी जास्त काळजी वाटते आहे..."

    "अच्छा... म्हणजे राणीसाहेबांना आमची जास्त काळजी आहे तर..."

    "चल आता येथून... पाऊस थांबल्यावर परत येऊ इथे..."

    "जो हुकूम, राणीसाहेबा..."

    हात बाजुला सावरत तो अनिता बाजुला होण्याची वाट पाहू लागला. अनितानेदेखील त्याच्याभोवती आवळलेले हात काढून घेतले व तीसुद्धा त्याच्यापासून बाजूला झाली.
    राहूलने तेथेच बाजूला उभी केलेली बाइक काढली व अनेक प्रयत्नांति शेवटी चालू  केली... अनिता तोवर स्तब्ध उभी होती, व बाइक चालू झाल्यानंतर राहूलच्या पाठीमागे जाऊन बसली. ती व्यवस्थित बसली आहे की नाही, याचा अंदाज घेऊन त्याने बाइक शाळेच्या दिशेने हाकली. तिथून शाळा फक्त २ किमी अंतरावर होती. सुटी असल्याने शाळेच्या गेटला देखील कुलूप होते व चोहोबाजूंनी उंच भिंतींचे कुंपण असल्याने मध्ये जाण्यासाठी इतर कुठलिही वाट नव्हती. शाळा मोठी असल्याकारणाने तेथे गेटच्या बाहेरच सेक्युरिटी गार्डसाठी एक एक छोटीशी खोली करण्यात आली होती. तिथे दरवाजा मात्र नव्हता, ही गोष्ट राहूल व अनिताला आधीपासूनच ठाऊक होती, म्हणूनच ते तिथे आले होते. पावसाच्या सरी ज्या दिशेने कोसळत होत्या, त्या दिशेला खोलीमधून त्या सरी भिंतीमुळे आतमध्ये येऊ शकत नव्हत्या, त्यामुळे ती खोली अजुनही कोरडीच होती. आणि चांगली गोष्ट म्हणजे तिथे बसण्यासाठी आधीपासूनच बाकासारखे वीटा-सिमेंट इत्यादींद्वारे बांधकाम केलेले होते. राहूलने बाइक लगेच बाहेर उभी केली व ती दोघे त्या खोलीत गेले. राहूल खोलीत गेल्या-गेल्या तेथील बाकावर जाऊन बसला. अनिताने खाली बसण्याअगोदर आपले विस्कटलेले केस व्यवस्थित करु लागली, यावेळी तीच्या केसांमधील पाण्याचे थेंब त्याच्या चेहर्‍यावर तुषाराप्रमाणे उडत होते... तो तिच्याकडे एखाद्या नलाप्रमाणे पाहत होता, ती आता दिसतच तशी होती, एखाद्या रतीप्रमाणे... अगोदरच ती अतिशय सुंदर होती, तीचे तारुण्य तीच्या प्रत्येक अवयवात, अंगात झळकत होते... आणि आता तर ती पुर्णपणे भिजून ओली-चिंब झालेली होती. आज तीने पर्पल रंगाचा अतिशय सुंदर टॉप अन् निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती, हा ड्रेस तिच्या मागच्या वाढदिवसाच्या वेळी राहूलनेच तीला भेट म्हणून दिला होता. कोणतीही सुंदर तरुणी तीच्याकडे बघणार्‍याला कामोवृत्त करतच असते... अनिताही तशीच, आणि आता तर संपुर्णतः भिजलेली... जरी राहूल तीच्याकडे कामुक नजरेने पाहत असला तरी तो संयम बाळगून होता. त्याच्याजागी एखादा दुसरा असता, तर आतापर्यंत त्या दुसर्‍याने सीमोल्लांघन करुन अग्नि पेटवला असता... हे तर नैसर्गिकच म्हणता येईल. मग राहूल का संयम ठेवून होता, आणि एवढा संयम बाळगणं कसं शक्य होतं बरं... आणि महत्वाचं म्हणजे अनितालादेखील ही गोष्ट ठाऊक असणारच की तो सध्याच्या घडीला काय करु शकत होता ते, पण तरीही ती त्या गोष्टीकडे काहीच लक्ष देत नव्हती... त्याच्यामध्ये अथवा तीच्यामध्ये काही प्रॉब्लेम असण्याचा प्रश्नच नव्हता... या सर्व गोष्टींमागचे अप्रत्यक्ष कारण पुर्वी झालेल्या एका घटनेमध्ये दिसून येतं...

    घटना आहे, ती दोघे तीसर्‍या सेमीस्टरला असतांनाची, म्हणजे सेमीस्टरची परिक्षा झाल्यानंतरची... अभियांत्रिकी मध्ये प्रत्येक वर्षात २ सेमीस्टर्स असतात, म्हणजे ४ वर्षांत एकूण ८ सेमीस्टर्स... राहूल आणि अनिता यांची भेट द्वितिय वर्षाच्या सुरूवातीला, म्हणजेच तीसर्‍या सेमीस्टरच्या वेळी झाली होती. त्यानंतर त्यांच्यामधली सलगी वाढतच गेली. राहूलचे तीन जवळचे वर्गमित्र अन् अनिताच्या चार वर्गमैत्रिणी असे एकूण ९ जणांचे फ्रेंड सर्कल काही दिवसांतच तयार झाले. राहूल, हर्षद, अंकित, अजय, अनिता, राजश्री, सुमेधा, निशा, कावेरी असे हे या फ्रेंड-सर्कलचे सदस्य... राहूल अन् अनिता यांची भेट हाच सुरुवातीला या फ्रेंड-सर्कलमधील गजबजलेला विषय असायचा... त्यासाठी लेक्चर्स, काहीवेळा प्रॅक्टिकल्स बंक करण्याचेदेखील प्रमाण वाढत गेले. दररोज एकमेकांचे  डबे एकत्र बसून खाण्यात काय मजा असते, हे त्यावेळी कॅंटीनमध्ये या सगळ्यांना पाहणारे त्यांच्याच वर्गातले इतर मुले-मुली त्यांचा खूप हेवा करीत असतील. त्यांच्या गप्पा रंगायच्या, त्या तास-दोन तास सहज चालायच्या... त्यांची रोजची हीच दिनचर्या, कॅंटीन, पार्किंग, आणि केलं तर एखाद-दोन लेक्चर्स वा प्रॅक्टिकल... तीसरे सेमीस्टर असेच मजेत निघून गेले... परिक्षा तशा अपेक्षेप्रमाणे कधी जातच नसतात, पण नेहमीप्रमाणे मुलींनीच (आणि यांच्या ग्रुपमध्ये देखील अपवाद नव्हता!) टॉपच्या जागा मिळवल्या... आनंदाची गोष्ट म्हणजे सुमेधा क्लास-टॉपर आली होती त्यावेळी... सर्वांनी तीच्याकडून तशी जबरदस्त पार्टी देखील घेतली होती त्यासाठीची... राहूल, हर्षद, अजय, अनिता, सुमेधा ही सुखवस्तू कुटूंबांतील एकुलती-एक मुलं... त्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या तशा होत्याच, शिवाय राहूलकडे घरी दोन लक्झुरी कार्सशिवाय टोयोटोची इनोव्हो देखील होती. वडीलांचा स्वतःचा व्यवसाय असल्याकारणाने त्याला पैश्यांची तशी कधीच गरज भासत नसे, पण तो इतर "रईसजादोंकी औलाद"प्रमाणे कधीच आपली श्रीमंती मिरवीत नसे वा त्याला त्या गोष्टींचा गर्व देखील नव्हता. हं, फक्त त्याच्याकडे महागडी बाइक, ब्रॅंडेड कंपन्यांची साधने, कपडे इत्यादी गोष्टी असायचा, पण त्यामुळे कोणाला त्याचा हेवा वाटेल, असं त्याचं वर्तन कधीच नसे. अंकित, राजश्री, निशा ही सुद्धा तशी मिडल-क्लास कुटूंबांतील मुलं, त्यांनाही पैश्यांची म्हणावी तशी चिंता नसायची, फक्त त्यांच्याजवळ स्वतःच्या गाड्या नव्हत्या, एवढाच काय तो फरक...! परिक्षा झाल्या, आता कुठेतरी बाहेर ट्रिप करुन जावं, असं बहुदा प्रत्येकाच्याच मनात होतं... सुमेधाच्या पार्टीच्या वेळी अनितानेच विषय काढला. सर्वांनी होकार दिला, हिवाळा असल्याने मस्त हिल-स्टेशन वगैरेकडे जाण्याचा मुलांच्या बाजुने सुर निघाला. पण मुलींना आधीच ट्रिपसाठी घरच्यांकडून परवानगी मिळण्याचे चान्सेस नव्हतेच, आणि जरी परवानगी मिळाली तर ती फक्त मुलीच ट्रिपला जाणार आहेत, असं सांगूनच मिळणार होती आणि त्यासाठी दिवसभरात हिंडून परत येता येईल, असे ठिकाण त्यांना हवे होते. शहरापासून अंदाजे ७०किमी लांब असलेलं एक लोकप्रिय हिल-स्टेशन ठरलं... पर्वतरांगेमधला एक उंचच-उंच डोंगर, उंचावरून वाहणारा धबधबा, चोहोबाजूंचा निसर्गरम्य परिसर, दाट हिरवळ व अनेक इत्यादी एकापेक्षा एक मनोरम गोष्टी असलेलं हे हिल-स्टेशन सर्वांनी पक्कं केलं... लगेच दुसर्‍या दिवशी जायचं, हे देखील नक्की करण्यात आलं. राहूलची इनोव्हो करून जायची, हे निश्चित. त्याने घरी अगोदरसुद्धा ट्रिपसाठी गाडी मागितली होती, अन् त्याला मिळालीही होती, त्यामुळे यावेळीही गाडी मिळून जाईल, हे राहूलला माहित होतं. दुसर्‍या दिवसासाठी सर्वांनी प्लॅनिंग चालू केलं, खायला काय-काय आणायचं की बाहेरच कुठेतरी जेवायचं वगैरे वगैरे गोष्टींवर दुसरा दिवस उजाडेपर्यंत चर्चा चालूच होती.


(क्रमश:)


2 प्रतिक्रिया:

अनामित म्हणाले...

"त्याची दाढ ठेऊन "

अरे तुला हनुवटी म्हणायचं आहे का?
दाढ... कसं शक्य आहे!
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@ आल्हाद,

हा हा... बरोबर आहे. चुक सुधारलीय... आभार!

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre