दिवाळीनंतरची ट्रेक...

» शनिवार, ७ नोव्हेंबर, २००९

सन २००९ म्हणजे ह्या वर्षाची दिवाळी एवढी कंटाळवाणी गेली ना की बस्स....! एवढा बोअर मी कधीच झालो नव्हतो. दिवाळी अन भाऊबीजला माझ्या मामांच्या मुलाला (गौरवला) घरी बोलवून घेतले. पण तो घरी आल्यावर पण काही कंटाळा जात नव्हता. सलग ते दोन दिवस आम्ही ज्युस पीणं, पिक्चर्स पाहणं, अन पत्ते खेळणं यासारख्या कामांमध्ये घालवले. तो जातेवेळी म्हणाला की यार खुप बोअर होतयं आणि लगेच दुसर्‍या दिवसापासून कॉलेज चालू होणार असल्याने अजुनच खुपच बोअर होईल, त्याकरता आपण गावाकडे २-३ दिवस जाऊन येऊ. तसा मला त्याचा विचार पटला, पण यावेळी मी कुठेही फिरण्याची प्लॅनिंग केलेली नव्हती. पण दोघांनी घरच्यांशी विचारविनिमय करून जायचे पक्के केले. आमचे, मामांचे आणि मावश्यांची गावे ही सर्व जालना अन विदर्भाच्या (बुलडाणा) बॉण्ड्री वर आहेत. त्यामुळे सगळ्यांकडे जाणे तसे खुपच सोयिस्कर होते. लगेच दुसर्‍या दिवशी आम्ही दोघे गावाकडे निघालो. मामांनी सांगितले होते की जमले तर अजिंठा (अजंता केव्ह्ज), लोणार (खार्‍या पाण्याचे सरोवर) आणि जर जावसं वाटलचं तर शेगावला (गजानन महाराज) जाऊन या. सोबत ६००-७०० रूपये घेऊन आम्ही लगेच दुसर्‍या दिवशी प्रवासास निघालो. वेळेवर बस मिळाली. औरंगाबाद - बुलडाणा/मलकापूर/शेगाव गाड्या असतातच. सगळ्यांचा रूट एकच, तो म्हणजे औरंगाबद-सिल्लोड-भोकरदन-धाड-बुलडाणा-शेगांव/मलकापूर! आम्ही शेगाव गाडीत बसलो अन जायला निघालो. आम्ही या गाडीने डायरेक्ट शेगावला गेलो असतो, पण दोघेही प्रथमच चाललो असल्याने बिगर-माहितीचे तिथे जाणे योग्य नव्हते अन नातलगांकडे गेलो नाही तर त्यांना राग यायचा फुकटच, म्हणून डायरेक्ट शेगावला जाण्याचं कॅन्सल केलं. दोन-अडीच तासांनी धाड या स्थानकावर उतरून आम्ही आमची पुढची वाट धरली.

दोन दिवसांत मामा-मावश्या भेटून झाले. तिसर्‍या दिवशी तरी शेगाव किंवा अजिंठा करायचंच असं आम्ही ठरवलं. पण पुन्हा एक प्रॉब्लेम....! माझ्या दोन मावसबहिणी (मावशीच्या मुली) ज्या दोघींच्या लग्नाला मी अनुपस्थित होतो, त्यांनी आम्हाला वेठीस धरले की आम्ही दोघांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी म्हणजे शिरसोली (जिल्हा जळगाव) एवढ्या लांब यावं. तेथून मग आम्ही रेल्वेनं शेगावला जावं. आमचे सगळे प्रयत्न फसले. त्या दोघींनी बळजबरीने आम्हाला जळगावला नेले. एक गोष्ट तर सांगायची राहिलीच, ज्या दिवशी आम्ही निघालो होतो, त्या दिवशीच माझे कॉलेज चालू झाले होते, अन २९ ऑक्टोबर पासून आमचे सबमिशन चालू होणार होते. अन गंमत अशी की माझं कोणत्याचं विषयाचं काहीही कम्लिट नव्हतं, तेव्हा माझी ट्रेकहून आल्यावर खरी पंचाईत होणार होती. पण मूड फ्रेश होण्याच्या हेतूने आम्ही इकडे आलो होतो. अन इकडे काही औरच घडत होते. तशा त्या दोघी बहिणी सर्वसुखी होत्याच, कारण मी ऐकलयम की जळगावची लोकं खूप श्रिमंत आहेत म्हणून....! दोघींच्या घरी किमान प्रत्येकी ३०-४० एकर शेती होतीच. मला तिकडे जाऊन एका गोष्टीचा प्रत्यय जरूर आला तिकडच्या लोकांच्या बोलण्यातून, तो म्हणजे खान्देशी भाषा समजण्याच्या पलिकडची होती. लोकं नेमक्या कोणत्या विषयावर बोलताहेत हे समजायला देखील चान्स नव्हता. दोन्ही भाऊजींच्या बोलण्यातून ते "ळ"चा "ड" असा उच्चार करतात, असे समजले. जसे की "जळगाव"ला ते "जडगाव" असे उच्चारीत होते. माझ्या ताईने पण सांगितले की ती भाषा आमच्या मराठवाड्यातल्या भाषेपेक्षा खुपच वेगळी आहे. तिथे दोन दिवस मजा मारली. पहिला दिवस तर त्या दोन्ही बहिणींकडे जेवण्या-खावण्यात अन भाऊजींसोबत त्यांच्या शेती पाहण्यातच गेला. हं तिथे पोटाचा जरा प्रॉब्लेम आलता पण तिथे "गोटी सोडा" म्हणून एक मस्त सोडा मिळतो, तुमचं कितीही अपचन झालं असेल तरी या सोड्यानं ५ सेकंदात पोट साफ....! मी तर एक घोटात दोन ग्लास पिऊन घेतले होते! कारण तसं भाऊजींनी सांगितली होतं.... पण पितांना कळालं की तो सोडा कडक म्हणजे एखाद्या वाईनसारखा होता. पण ताईने सांगितलं की तो दारू-वारूचा प्रकार नसून तिकडचं नावाजलेलं पोट साफ करण्याचं फेवरिट पेय होतं...! लगेच दूसर्‍या दिवशी दोन्ही भाऊजींनी त्यांची शेतीची कामे लवकर आटोपून "पद्मालय" आणि "भीमकुंड" ही दोन्ही पवित्र धार्मिक तसेच हिरवीगार ठिकाणे आम्ही पहावी अशी कल्पना मांडली. गौरवला अन मला तर घरी बसून बोअरच होणार होते, कारण तिकडे १२ तासांचे लोडशेडिंग असल्याने टिव्ही नाही अन दोघी बहिणी मळ्यात जाणार होत्या. आम्ही जायचे ठरवले. दोन्ही भाऊजींकडे टू-व्हिलर्स तसेच कार पण होत्या, पण टू-व्हिलर्सवर येणारी मजा काही वेगळीच. या ट्रेकबद्दल आणि लगेच त्याच्या पुढल्या दिवशी शेगावला (मी) प्रथमच रेल्वेद्वारे गेलो, तेथील सर्व फोटोंसहित आणि आम्ही केलेल्या मौज-मजेचे सविस्तर वर्णन मी तुम्हाला पुढील तीन पोस्ट्समध्ये सांगेन, तोपर्यंत टा टा......!

0 प्रतिक्रिया:

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre