६ ऑगस्ट...

» शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०१०

(वाचलेल्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी व अमेरिकेवरील द्वेष जाहीर करण्यासाठी म्हणून हा लेख लिहिण्याचा यथेच्छ खटाटोप!)

६ ऑगस्ट... तारीख ऐकतानाच त्या निष्पाप लक्षावधी लोकांच्या आर्त किंकाळ्या तुमच्या कानांत घुमल्या नाहीत, तर नवलच...! दुसर्‍या जागतिक महायुद्धाच्या काळात आशिया (खासकरुन चीन) व आखाती देशांमध्ये साम्यवादाची बीजे अंकुरत होती, त्याला पायबंद घालणे गरजेचे होते, शिवाय जपानचे चीनशी पार्श्व-ऐतिहासिक शत्रुत्व उघड होते, जपानसाठी योग्य संधी चालून आलेली होती. चीनला आधीच रशियाचे सहकार्य होते, त्यामुळे जपानला जर्मनीकडून यावे लागले. चीनसारख्या हत्तीसमोर एखाद्या उंदरासारख्या वाटणार्‍या जपानने कसल्याही शिल्लक मदतीशिवाय एक तृतियांश चीन काही महिन्यांतच काबीज करुन टाकला होता. या काळात जपानने आपला सर्व राग चीनवर काढला.. शेवटी जय झाल्यावर गर्व सामावलेली जयाची आणखी भूक वाढतेच... पॅसिफिक महासागरात त्यावेळी अमेरिकेचे वाढणारे वर्चस्व जपानला मुळीच पचण्यासारखे नव्हते, शिवाय पर्ल हार्बर बेटावर अमेरिकेच्या कारवायांमध्ये होत असलेली वाढ जपानसाठी धोक्याची घंटा होती. जपानने वेळीच सावध होऊन पर्ल हार्बर वर एका-पाठोपाठ आकस्मित हवाई हल्ले करुन अमेरिकेच्या तेथील सर्व युद्धसाहित्याची अक्षरशः नासाडी केली, यामध्ये अमेरिकेच्या नौदलातील सैनिकांव्यतिरिक्त शेकडो सामान्य नागरिकांचे बळी गेले. या घटनेचा अमेरिकेने तीव्र निषेध नोंदवत दोस्त राष्ट्रांच्या बाजूने दुसर्‍या महायुद्धामध्ये अचानक उडी घेतली. येथेच हिटलरची पंचाईत झाली. आता रशिया पाठोपाठ अमेरिकेसारख्या आणखी एका बलाढ्य राष्ट्राशी जर्मनी व इतर अक्ष कराराने जोडल्या गेलेल्या राष्ट्रांना कुरघोडी करणे भाग होते. तरीसुद्धा हिटलरने न डगमगता व खचून न जाता हे आव्हान पेलले व आपली विजयाची घोड-दौड चालू ठेवली.

Vishal Telangre