सादर करीत आहोत: "मराठीमंडळी.कॉम"

» गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१०

सादर करीत आहोत, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ, 

यंदाच्या धुळवडीच्या दिवशी, १ मार्च २०१० रोजी.
फाल्गुन कृष्ण द्वितिया, शके १९३१.
रात्रौ: १०:०३ मि. (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
आपली ऑनलाईन

अधिक माहितीसाठी जरुर लिहा अथवा चॅट करा
pankajzarekar[AT]gmail[DOT]com
mebhunga[AT]gmail[DOT]com
aniket.com[AT]gmail[DOT]com
vikrant.deshmukh888[AT]gmail[DOT]com
vishaltelangre[AT]gmail[DOT]com



ज्ञानेश्वरांच्या”परि अमृताच्याही पैजा जिंके” नंतर कुण्या पोर्तुगीज फादर स्टीफन्सने लिहिलेल्या या ओळीच मराठीचा गोडवा सांगण्यास पुरेशा आहेत. आहेच आमची मऱ्हाटी वाणी अशी की… कुणालाही ऐकताना भुरळ पडावी. कुणी मनापासून कौतुक केले की कानात सतारीच्या तारा छेडल्याचा भास व्हावा आणि अगदी मनापासून शिवी हासडली तर कानात उकळते तेल ओतल्यागत जाळ अंतर्मनात निघावा अशी आमची मराठी. “महा”राष्ट्राची बोलीभाषा, राजभाषा आणि जनभाषा.
होय तोच मराठी जिथे प्रांत उगवत्या सुर्याच्या साक्षीने मंदिरातल्या काकडआरतीबरोबरच मशिदीची पहिली सुरेल बांगही तेवढीच सुंदर ऐकू येते.  जिथे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीने अवघ्या जगाला वेडे केले. तुकोबांच्या अभंगांनी अवघा मनुष्यगण अद्वैत झाला. संत एकनाथांनी जगाला भूतदयेचा संदेश दिला. रामदास स्वामींनी बलोपूजेचा मंत्र फुंकला.
याच संत-महंतांपासून स्फूर्ती घेऊन शहाजीराजे आणि जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला, शिवाजी महाराजांनी याच ओघवत्या मराठी भाषाकौशल्यावर जेधे, पिंगळे, देशपांडे, गुजर, मालुसरे अशी वाघाच्या काळजाची माणसे जोडली, महाराष्ट्राबाहेर जाऊन प्रांत जोडला आणि परक्या शक्तींना आपल्या तलवारीच्या आणि या मराठी मातीतून आलेल्या धाडसाच्या जोरावर पाणी पाजले. याच मराठी धर्मापायी संभाजीराजांनी मृत्यू कवटाळला.पेशव्यांनी शिंदे फडणीसांच्या बळावर अटकेपार झेंडे लावले. तात्या टोपेंनंतर वासुदेव बळवंत फडकेंनी क्रांतीची पताका उभारली आणि पुढे टिळक, आगरकर आणि सावरकरांसारखे निधड्या छातीचे वीर ती पताका घेऊन मिरवले.
गोखले, आंबेडकर, कर्वे, फुले, विनोबा भावे, भाऊराव पाटील, कॉ. डांगे यांसारख्या समाज धुरिणांनी जो पाया घालून दिला होता त्यावर बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय, अशासारख्यांनी कळस उभारला. कला-क्रीडा आणि साहित्यामध्येही फाळके, मंगेशकर, प्रभात, भीमसेन जोशी, पुल देशपांडे, माडगूळकर, तेंडुलकर ते आजचे सलील-संदीप, अजय-अतुल, गावसकर, कुंटे, हजारे, वाडेकर अशा अनेक रथी-महारथींनी जग पादाक्रांत केले आहे.

ही सगळी ऊर्जा कुठून आली? त्याचे एकच उत्तर आहे “आमची मराठी”. होय तीच मराठी अस्मिता जी सह्याद्रीच्या कातळकड्यांत आहे, भीमा-कृष्णा-कोयनेच्या तीरावर आहे, कोकणातल्या लाल मातीत आहे, विदर्भाच्या रांगड्या बोलीत आहे, मराठवाड्यातल्या अजंठा-वेरुळच्या पाषाणकलेत आहे, सातपुड्याच्या थंड हवेत आहे. त्याच मातीने आम्हाला जन्म दिलाय. आणि तिचे आमच्यावर सात जन्माचे ऋण आहे. या ऋणातून आम्ही मुक्त होऊ इच्छित नाही. पण थोडी का होईना परतफेड नक्की करावीशी वाटते आहे. म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न. “मराठी मंडळी”चा…!!!

नऊवारी जरीकिनारी पैठणी, बुगड्यांची माळ आणि पसाभर मोठी नथ घातलेले खानदानी सौंदर्य या मराठी भाषेच्या अलंकारामध्ये दडलेले आहे. शाहिरी पोवड्याची डफाची थाप, लेझीमची गाज आणि ढोल-ताशाचा नाद मराठी भाषेत वीररस काठोकाठ ओतत आहेत. ढोलकीवरचा ताल आणि घुंगराचा छणछणाट ऐकून मराठीचा घट शृंगाररसाने निथळत आहे. नाट्यसंगीताचा आब मराठीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो आहे. तसाच सुमधुर भावगीताने धबाबा कोसळणारा अधीर मनःप्रपातही संथ होतो आहे.
संक्रांतीच्या तिळगूळाने ऊबदार आणि मधुर झालेली मराठी वाणी जहालपणे शिमग्याला मुक्तहस्ते शिव्या देऊ शकते आणि धुळवडीला गटारात लोळवू शकते. काळ्या आईचं दान संक्रांतीला वाणाच्या रुपाने तिला परत करायचं हे या मराठी माणसांनीच जगाला शिकवले. याच मराठी काव्य-शास्त्र-विनोदाने अवघ्या विश्वात सन्मानी गुढ्या उभारल्या आहेत. आषाढी-कार्तिकीला अवघा महाराष्ट्र “ग्यानबा-तुकाराम” करत भक्तीरसात न्हाऊन लाडक्या विठूमाऊलीला भेटायला पायी वारीला निघतो. श्रावणी सोमवारच्या गाभाऱ्यातल्या पहाटेची धीरगंभीर मंत्रोच्चारणा अवघे ब्रम्हांड अवतरल्याचा अनुभव देते. बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणाचा घास भरवून त्याच्याही उपकारांची जाणीव आम्हांला असते. गौरी-गणपतीला अवघा महाराष्ट्र उत्सवी वातावरणात रमून जात असतो. कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात केशरी दुधाच्या साथीने गप्पांना काय तो बहर येतो. दिवाळीला अवघा मराठी मुलुख ऐश्वर्यात न्हाऊन निघतो. एवढे ऐश्वर्य की लक्ष्मीपूजनला उदारपणे जुगारही खेळावा. पाडव्याला नथ सांभाळत कारभारीला ओवाळणारी घरधनीण आपल्या सख्याकडे किती नजाकतदार लाडिकपणे पाहून पाडवा “वसूल” करत असते हे काय अवघ्या मराठी मुलखाला ठाऊक नाही?

अशी ही विविधरंगी विविधढंगी मराठी संस्कृती. हिच्या पायीच आम्ही हा यज्ञ सुरु केला आहे. खात्री आहे की आपण पण या यज्ञात सामील व्हाल. आपणा सर्वांचे स्वागत.

आम्ही “मराठी मंडळी”ला यज्ञ म्हणतोय कारण, आम्हाला पुर्णपणे कल्पना आहे की सगळ्याची सुरुवात ही नवख्याच्या नशिबानं होते, आणि मग सुरु होते अत्यंत खडतर अशी परिक्षा… पदोपदी! पण तरीही हा यज्ञ करण्याचा घाट आम्ही घातलाय… आपल्या माय मराठीसाठी. आत्ताच्या जगामध्ये आणि जागतिकीकरणामध्ये कोणतीही प्रादेशिक भाषा टिकवुन ठेवणं तसं अवघड झालंय. पण ते अशक्य नक्कीच नाही! आपली मराठी या रेट्यातही टिकुन राहावी यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. मराठी साहित्य तर समृद्ध आणि सक्षम आहेच. कोणी अजुनही मराठी वाचन आवर्जून करतोय, कोणी मराठीमधुन लेख लिहीतोय. अनेक मराठी वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आहेत ज्यातुन बरेच लोक आपले लेख लिहीत असतात. असंच अजुन एक माध्यम आहे – ब्लॉग्स. तुम्हाला वाचतांना आश्चर्य वाटेल, पण आजमितीला सुमारे १५ ते २० हजार लोक आपापल्या ब्लॉग्सवर मराठीमधुन लिहीत आहेत! हे लोक तिथं आपल्या कथा लिहीतात, कविता प्रकाशित करतात, मतं मांडतात, अभ्यासपुर्ण लिखाणसुद्धा  करतात!! आणि हो, इथं सुद्धा तेवढंच दर्जेदर लिखाण असतं!!! पण अजुन म्हणावा तेवढा प्रकाशझोत या माध्यमावर आणि या माध्यमातुन लिहिणाऱ्यावर पडलेला नाहीये. नेमकं याच कारणासाठी हा यज्ञ आहे. या यज्ञाचं स्वरुप, त्याची व्याप्ती आणि त्याची फलनिष्पत्ती याबद्दल स्वतंत्रपणे लिहुच, पण यात सगळ्यात महत्वाचं ते सुरुवात करणं.

तर अशी ही आमची “इये मराठिचिये नगरी”!

संक्रांतीचा मुहुर्त साधून याच मराठी आईचे वाण घेऊन आम्ही वाटचाल सुरु केली. आमची सगळी एकेकाची संगणक कौशल्ये एक केली आहेत या “मराठी मंडळी” नावाच्या सुगड्यात. येताय ना तुम्ही पण? यंदाच्या धुळवडीला हा चौदा विद्या, चौसष्ट कला असा विविधरंगांनी भरलेला घट आम्ही तुमच्यावर रिता करत आहोत, तुम्हांला नवरसात चिंब भिजवायला… आहात ना तयार?

6 प्रतिक्रिया:

साधक म्हणाले...

तुमचे इपत्ते महाजालावर जसेच्या तसे टाकू नका शेकडो स्पॅम येतील. at gmail dot com असे लिहा.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@साधक, अरेच्च्याऽऽ, खुप खुप आभार साधकजी माहित केल्याबद्दल.. मी दुरूस्त केलयं ते.. ;)
Onkar Danke म्हणाले...

नेमका काय प्रकार आहे ? जरा सविस्तर माहितीचा ब्लॉग लिहावा...
अपर्णा म्हणाले...

विशाल अगदी नेमकं लिहिलंस...सगळीच ब्लॉगर्स आतुरतेने वाट पाहात असणार याची खात्री...
शुभेच्छा..
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@ओंकार डांकेजी (झी २४ तासचे पत्रकार), नमस्कार ओंकारजी.. वर दिलेली माहीती हे साईटच्या उद्‍घाटनाचे सुतोवाच आहे. साईट लाँच झाल्यानंतरच तुम्हाला सर्व कळेलच. तेव्हा जरा थोडा धीर धरा आणि (वाट?) पाहा..

धन्यवाद... :)

******

@अपर्णा, अगं हा लेख पंक्याने तयार करून दिलाय, त्यामुळे सगळं श्रेय त्याला..! बाकी माझी उत्कंठा तर शिगेला पोहोचलेली आहे, इतरांचे काय हाल असतील ते सांगता येत नाहीत..! ;P
Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

सोहळ्याला उपस्थिती नोंदणीतील सर्व त्रुटी दूर केल्या आहेत. कृपया पुन्हा एकदा प्रयत्न करावा. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.

-मराठी मंडळी

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre