विचित्र स्वप्नानुभव

» मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

     किती अफाट हे वाळवंट... जिकडे नजर टाकावी, तिकडे वाळूचे उंचच-उंच डोंगर... गेल्या दोन-तीन तासांपासून मी सलग, कुठेही न वळता चालतोय... वर तळपता सूर्य, तहानेने अगदी व्याकूळ झालोय... व्याकूळ म्हणजे कंठ एखाद्या दुष्काळग्रस्त झर्‍याप्रमाणे कोरडा पडलाय, अगदी दयनीय अवस्था... ओसाड, पडीक, वाट नसलेल्या वाळवंटामधून वाट काढत मी चालतोच आहे. मी इथे का, कसा, व नेमका कशासाठी आलो—सगळे प्रश्न निरुत्तरित, माझे मलाच उत्तर मिळत नाहिये... आता माझ्यापुढे फक्त एकच ध्येय उरलंय, ते म्हणजे या अत्यंत उष्ण अन् रेताड नरकातून कसल्याही परिस्थितीचा सामना करीत बाहेर पडायचे म्हणजे पडायचेच... मला वाळवंटात असणार्‍या नंदनवनाबद्दल म्हणजेच ओअॅसिस बद्दल माहिती आहे, म्हणजे मी त्याबाबत कुठेतरी, कुणाकडूनतरी ऐकलंय... त्याच्याच शोधार्थ मी आता पायपीट करीत, सूर्य मावळतीच्या दिशेने वाळूचे एक-एक डोंगर पादाक्रांत करीत चालतोच आहे. एव्हाना प्रचंड तळपणारा सूर्य आता मावळतीच्या दिशेने जात असतांना फारच विलोभनीय दिसतोय, ना का माझ्या मनात त्याच्याबाबत तिटकारा व्यक्त होईल असा भाव निर्माण झाला असला तरी... सृष्टीचे असे हे भावविभोर करुन टाकणारे सालस, मनमोहक दृश्य पाहण्याचा योग सगळ्यांच्याच नशिबात नसतो, त्यामुळे त्या सूर्याबाबत मी आज बाळगत असलेला द्वेष टाकून दिला. थंडी वाढत चाललीय... मनात काहीतरी विचार चालू आहे, कसला ते मात्र माहिती नाही... डोक्यात असेच काही-बाही विचारांचे चक्र चालू असतांनाच मला कसलातरी पूर्वपरिचित आवाज अगदी पुसटश्या स्वरुपात ऐकायला आला. पहिल्या क्षणी तरी तो केवळ घायाळ झालेला मनाचा भ्रम असावा, असे मानून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण जसजसे मी समोर जाऊ लागलोय, तसतसा तो आवाज अधिकच स्पष्ट, सुस्पष्ट होत येतोय... अरेच्चाऽऽ, देव पावला म्हणायचा... हा गाडीचाच आवाज, त्यातील जोडपं हसत-खिदळत माझ्याच दिशेने येतंय... एरवी त्यांच माझ्याकडे लक्ष नव्हतं, मी अगदी मधोमध, त्यांच्याच वाटेत थांबलेलो... जर त्यांचं माझ्याकडे अजुनही लक्ष गेलं नसेल, तर मी नक्कीच यांच्याच गाडीखाली चिरडला जाईल, हा विचार डोक्यात एकाएकी चमकून गेला अन् माझा तर थरकापच उडाला... मी संपुर्ण शक्तिनीशी जोरात किंचाळलो... माझं नशीबच बलवत्तर म्हणावं लागेल... अवघ्या काही फुटांवर असतांना माझा कर्कश आवाज ऐकून त्यांनी गाडी लागलीच थांबवली... उष्णता, भूक, तहान, थंडी इत्यादींमुळे माझ्या जीर्ण झालेल्या शरीरयष्टीकडे बघून त्यांना माझ्याबाबत अंदाज बांधायला जास्त वेळ लागला नसावा... त्या जोडप्याने त्यांच्याकडील पाणी असलेली बाटली घेऊन ते खाली उतरणार... नि एवढ्यात... माझ्या पायाला काही वेळेपासून काहीतरी हालचाल मला जाणवत होती, पण आता आपण या भकास व निर्मणुष्य वाळवंटातून सुखरूप वाचणार या आनंदात मी एवढा बूडून गेलो होतो की त्या हालचालीकडेदेखील मी पुर्णतः दुर्लक्ष केले होते. ते जोडपे गाडीतून खाली उतरते नि उतरते...
ती मुलगी माझ्या पायाकडे पाहून अक्षरशः किंचाळलीच... ती माझ्या पायांकडे तीच्या हाताचे बोट रोखून अचानक स्तब्ध व निःशब्द झाली... तीच्या प्रियकराने देखील अक्षरशः तोंडाचा 'आ' वासला... मी तर या युगुलाकडे पाहून आधीच हैरान झालोय, नंतर त्यांच्या नजरेच्या दिशेने माझ्या पायांकडे मी कटाक्ष टाकतो नि टाकतो... तोच... मी देखील टाहो फोडला... एका भला आडदांड, काळाकुट्टं साप (कोणता ते मात्र आठवत नाहिये) माझ्या उजव्या पायाच्या पोटर्‍यांवर एका मागोमाग एक असे दंश करतच चाललाय... मला याचे भानच नाही... तरीदेखील माझे प्राण वाचवण्यासाठी कशाचीही पर्वा न करता ती दोघे माझ्या दिशेने धावून येऊ लागली... तोच... आणखी एक विचित्र घटना... कानाचे परदे फाटतील, इतका भयंकर आवाज कानी पडला... सर्पाने दंश केल्याने माझ्या चेतासंस्थेवर परिणामी भौतिक गोष्टींचे आकलन करण्याच्या प्रभागावर मोठा परिणाम झालाय... पुढचे काहीच आठवत नाहीये, पण तो आवाज अतिशय वेगाने माझ्या डावीडून आला... तो कदाचित धरणीकंपच असावा... मला आठवतंय... मी ओरडतो आहे... वाचवा... कोणीतरी वाचवा मला... धरणीकंपामुळे त्या वाळवंटात अगदी माझ्या दोन्ही पायांच्या मधोमध पडलेल्या अरुंद व अतिशय खोल भगदाडामध्ये मी तळाच्या दिशेने पडतोय...

     धप्पऽऽ... मी अचानक बेडवरून खाली पडलो... अजुनही माझे आरबळणे चालूच आहे... वाचवा... कोणीतरी वाचवा मला... माझ्या बेडवरून खाली पडण्यामुळे आणि आरबळण्याच्या आवाजाने तीची झोपमोड झाली असावी, तशी ती एकदमच उठून माझ्याकडे आली... व मला गदागदा हलवतेय... ती नेमकी काय व कोणत्या भाषेत बोलत होती, हे मात्र मला आठवत नाहीये आता... ओह्हऽऽ... अरेच्चाऽऽ... ते स्वप्न होते तर... माझा घामाघूम झालेला चेहरा तीने टॉवेलने पुसला... काही वेळातच थंड पाणी अन् नंतर गरम दूध आणून दिलं तीने... एवढी प्रेमळ व काळजी घेणारी सहचारिणी मिळणे फारच कठिण अन् माझ्यासारख्या नशिबवान व्यक्तिलाच तशी सोबतीण मिळत असते, असा मी विचार करत असतांनाच ती खिडकीकडे चाललीये... खिडकीची काचेची तावदाने उघडी असल्यामुळे ती ते व्यवस्थित बंद करण्यासाठी जात असणार असं मला वाटलं... पण नाही, ते तसं काही नव्हतंच... मला प्रसंग आठवतोय, डॉक्टर सांगत होते की हिला निद्रानाश झाल्यानंतर देखील काही क्षणांतच पुन्हा झोप लागून झोपेतच चालण्याची अत्यंत वाईट विकृती जडलीये... मी नुसता बघत होतो, बेडवर मांडी घालून... खिडकी एवढी रूंद की अख्खा माणूस त्यातून सहज आत-बाहेर येऊ शकेल... दिसले, नाही मी बघितले... खिडकीची तावदाने उघडीच होती... ती खिडीकीच्या दिशेने जात होती... मला पक्कं जाणवलं, मी तिच्याकडे एकदम धावलो... पण नाही फारच उशीर केला मी... माझ्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडली... ****** (तीचं नाव काय आहे पण?)...

     मी अजुनही ओरडतोच आहे... ******... जोरात कानापाशी एखादा सुतळी बॉम्ब फोडावा असा कर्कश आवाज मला जाणवला... आमचा क्र्यू-लीडर माझ्या पुढ्यात मला कॉम्प्युटरसदृश्य स्क्रीनकडे बोट दाखवत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय... हे देखील एक स्वप्नच होते तर... च्यायला... $@#*?&% असा माझा मलाच कुठलातरी शिवीवजा आंग्ल वाक्प्रचार मी मनातल्या-मनात घोळला... माझी दिवास्वप्ने पाहण्याची सवय त्याला माहिती आहेच... पण यावेळी काहीतरी खूप मोठे अनिष्ट होण्याच्या मार्गावर आहे... अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका भल्या-मोठ्या अवकाशीय दगडाशी आमच्या अंतराळ-यानाची टक्कर होणार... माझ्याकडे मोठ्या विश्वासाने त्या आमच्या क्र्यू-लीडरने कुणालाही न जुमानता मला यानाचे कंट्रोल-युनिट सांभाळण्याचे काम सुपुर्त केले होते... पण माझी दिवास्वप्ने पाहण्याची खुळचट सवय आज आम्हाला यमसदनी नेण्याच्या मार्गावर आहे... नाही यमसदनी नेणारच... शेवटच्या क्षणापर्यंत काय झाले, ते मला व्यवस्थित आठवत नाहीये, पण जेव्हा आमचे यान त्या प्रचंड दगडाशी धडकले, तेव्हा आम्ही सर्वांनी अगोदरच आत्महत्या केलेली होती...

     मी वर्गात बसलोय... कसलेतरी कंटाळवाणे लेक्चर चालू आहे... अगदी मागच्या बाकावर बसण्याची माझी हौस काही औरच... पण मॅऽमच्या आता कुठे माझ्याकडे लक्ष गेलं... माझं तर पुर्ण लक्ष विचलीत झालेलं... यान, आत्महत्या, धडक, स्फोट... मी ते दृश्य बघतोय... हेलो यू... येस्स फ्रॉम लास्ट बेंच ऑन बॉइज् साइड, स्टॅण्ड अप... मी आतापर्यंत डोळे उघडे ठेऊन यानाची दृश्ये न्याहाळतोय... मॅऽमनी तिसर्‍यांदा जोरात आवाज दिल्यानंतर कुठे मी भानावर आलो... च्यायला वर्गात बसलोय मी... म्हणजे ते स्पेस-शटल मध्ये आत्महत्या, धडक वगैरे निव्वळ स्वप्न होतं तर... अचानक कसलातरी आवाज येतो... ह्म्म, वायब्रेशन तर माझ्याच खिशातूनच जाणवतंय... अरेच्चाऽऽ... रिंगटोन देखील परिचयाची वाटतीये... माझाच मोबाइल, ह्म्म, माझाच वाजतोय तर... फोन कट करायला मी मोबाइल हातात घेतला...

     Snooze again after 2 minutes... ओके बटन दाबल्यानंतर मी हा मेसेज बघितला... ह्म्म, सकाळचे ६ वाजले तर... मी वर्गात बसलेलो होतो ना... नाही आता तर झोपीतून उठल्यासारखं वाटतंय... चला म्हणजे फोन कट करण्यासाठी मी वर्गामधून थेट घरी आलो तर... काय स्वप्न आहे गड्या... हेत्तीच्या मारी... मला सर्व काही अगदी थोडं-थोडं आठवतंय... चला लिहायला सुरुवात करतो... लॅपटॉप काढला, खात्री पटावी म्हणून एकवेळ चिमटा काढला... आऽऽऽऽ... जाणीव होतेये चिमटा काढण्याची... काही क्षणांपुर्वी(?) मला एकामागे एक, नाही एकात-एक पडलेल्या स्वप्नांना लिहायला सुरुवात केली... मी हे जे लिहितोय, ते तरी वास्तव आहे ना की आधीच्याप्रमाणेच एक स्वप्न??? यावर काही कमेंट्स आल्या, तर त्या मी मुळात स्वप्नात वाचत असेन की प्रत्यक्षात जागी असतांना???

5 प्रतिक्रिया:

अनामित म्हणाले...

सुंदर लिहिला आहे लेख...आजच मित्रा कडुन Inception मुवी ची गोष्ट ऐकली. त्यामध्ये सुद्धा असच एका स्वप्नातुन दुसर्‍या स्वप्नात जात असतात.
हा लेख सुन्दर झाला आहे. वाचताना लिंक सुटली नाहि.
आनंद म्हणाले...

खूप सुंदर पद्धतीने स्वप्नानुभव मांडला आहे एकाच स्वप्नात तुम्ही कुठे कुठे फिरून आलात
छान !!!
Vaibhav Dalvi म्हणाले...

झकास! मित्र तुझ्या कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे. बस आता आपल्या मराठी चित्रसृष्ट्रीमध्ये अस काहीतरी झाले पाहिजे.
Unknown म्हणाले...

जबरा लिहिले आहेस
Thanks for anniversary wishes in marathi म्हणाले...

Very nice

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre