त्याग

» बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

ही वाट दूर जाते...

     पूर्वी त्याला सहजीवनाची तर सोडाच पण अगदी आप्तांमधल्या जन्मजात जुळलेल्या नात्यांची सुद्धा जाणीव नव्हती किंवा त्या नात्यांमध्ये स्वतःला गुंफून घेण्यासही तो कधी तयार होत नसे. "लाइफ इज सोऽ लॉन्ग..." अशी त्याची जीवनाबद्दलची भावना बनलेली होती. कौटुंबिक नि नैतिक हितसंबंध जपणे देखील त्याला जड जाई, अशा वेळी त्याची नेहमी पलायनाचीच भूमिका त्याच्या समोरच्याच्या नजरेत येत असावी कदाचित... त्याला या गोष्टीची जाणीव होती, पण मुळी ती गोष्टच आपल्यात कमतरता किंवा कमकुवतता (वीक पॉइन्ट) असावी, असे तो मनात आणून त्यावर पुढील वैचारिक मंथन करण्यासाठीची दरवाजे एकार्थी बंद करुन टाकत असे. असं असूनदेखील त्याने त्याच्या भवितव्याची स्वप्ने मात्र अशी उत्तुंग अन् अफाट रंगवली होती, जी इतरांनाच काय, पण स्वतः त्यालासुद्धा अविश्वसनीयच वाटायची. या काळात—निखळ मैत्रीची, एकमेकांत स्वैर गुंफलेल्या नाजूक नात्यांची किंवा एखाद्या प्रेमळ साथीदाराची मात्र त्याने कधीच स्वप्ने बघितली नाहीत वा त्याच्या नेहमी पडणार्‍या स्वप्नांत या गोष्टींना फारसे महत्वाचे स्थान नव्हतेच! अशी ही संकुचित भावना बाळगण्याचा त्याचा अट्टहास मनापासून मुळीच नव्हता, त्याने असं जगणं स्वतःहून अंगिकारलं देखील नव्हतं—मुळात त्याला या व अशा कित्येक गोष्टींची पुरती ओळख देखील झालेली नव्हती.


     आता कुठे त्याला आयुष्याच्या निराकार आभाळात जीवनाचा अन् त्याच आभाळात चहूबाजूंनी साकारलेल्या सप्तरंगी इंद्रधणुप्रमाणे स्वच्छंद व हर्षमयरित्या जीवन जगण्याचा आजवर अपरिचित असलेला खरा अर्थ उमगू लागला होता. सबबसुद्धा पूरक होती. एकाएकी शिशीरात ग्रीष्म बरसावा, अशा योगानेच घडणार्‍या चमत्कारिक घटनांसारखी घटना त्याच्या बाबतीत घडली. एकमेकांची कदर करणारे, एकमेकांबद्दल कसलेही संकुचित वा तत्सम् मत्सरयुक्त भाव मनी न बाळगणारे अन् सदैव मदतीस तत्पर राहणारे मित्र-मैत्रिणी त्याला मिळाले. किती आनंदाचे क्षण होते ते त्याच्या आजवर वाळवंटमय जगत असलेल्या जीवनात—अगदी एखाद्या सुगंधित व अतिशय मोहक अशा कमलपुष्पाने त्या रखरखत्या वाळवंटात उमलावे अशी! हो, आता तो त्याच्या पूर्वीच्या जगत असलेल्या जीवनाला "वाळवंट" म्हणू शकत होता अन् अगदी कमी काळात, याच मैत्रीच्या रिंगणात सर्वांचे हात आपल्या हाती धरुन, स्वच्छंद बागडता येईल अशा वातावरणात त्याच्यात नकळत अनेक मोठाले बदल घडून आले. जे अगोदरपासूनचे मित्र त्याच्या संगतीत अजुनही होते, त्यांच्याकडूनच या त्याच्यात एकाएकी घडून आलेल्या बदलांबद्दल त्याने ऐकले व तसे स्वतः अनुभवले देखील...

     त्याग, दुःख, दुरावा म्हणजे काय असते, यांचीच प्रचिती त्याला आता यायची शिल्लक राहिली होती. मित्र-मैत्रिणींच्या त्या घोळक्यातल्या एका जणाबद्दल त्याने आता स्वप्ने रंगवायला चालू केले होते, स्वतःहून नाही तर अनैच्छिकरित्या... प्रेम, तमा, जिव्हाळा, लळा, एकांत, कविता, सौंदर्य या नि अशा अनेक बाबींची उकल त्याला आता आपसूकच मिळत होती. दरम्यानच्या काळात त्याच मित्र-मैत्रिणींमधील निवडक जणांशी त्याचे जीवलग नाते जडले, ज्यांच्याकडे तो त्याच्या मनातल्या व त्याला सलत असलेल्या सार्‍या गोष्टी हलक्या करु शकत होता. त्याने या अशाच एका जीवलग मित्राकडे वरील "ती"च्याबद्दल कानी घातले, अन् तीच्यावर तो किती प्रेम करतो ते कळवले. पहिला धक्का—त्या जीवलग मित्राकडूनच कळाले की त्याच्याच मैत्र-रिंगणातल्या आणखी एकाचा, त्याच्याप्रमाणेच "ती"जवर जीव जडलाय, त्याने ते स्वतः अनुभवले देखील... त्याला नेमके कळून चुकले नि जाणवले की त्याच्यापेक्षा तो दुसरा, ज्याचासुद्धा "ती"जवर जीव जडलाय, तो त्याच्यापेक्षा अधिक प्रेम करतो, तो "ती"ला अधिक शोभेल, तो त्याच्यापेक्षा अधिक हूशार आहे, इत्यादी इत्यादी... त्याग काय असतो, याचा त्याला त्यावेळी प्रत्यय आला. मैत्र-रिंगणातील "त्या" निवडक जीवलग मित्र-मैत्रिणींशी अनेक बाबींवर चर्चा-विनिमय करुन त्याने पहिल्यांदा, अतिशय जीव जडलेल्या "ती"चा त्याग केला, फक्त मैत्रीसाठी! दुःख त्याने पहिल्यांदा मनापासून सोसले, पण फक्त काही काळापुरतेच!

     पहिल्या धक्क्यातून स्वतःला सावरतांना तो पुरता हतबल झाला होता, त्याला आता कुठल्याही गोष्टीत रसच उरला नव्हता. फुलांच्या मखमली अंथरूणावर झोपून देखील त्याला काटे रुतण्याचा भास होई. सर्व काही उदास, भकास असे त्याचे आता जीवन जगणे चालू होते. नेमकी त्याच काळात आणखी एक घटना घडली. जरी पहिले प्रेम हे "प्रेम" असते, असे लोक म्हणत असले तरी त्याला हे दुसरे प्रेम अधिक स्मरणात राहील. मैत्र-रिंगणातील "त्या" काही निवडक मैत्र-मैत्रिणींमधल्या दोघींची "ती" जीवलग मैत्रिण, जी त्यांच्या ग्रुपमधली नव्हतीच... योगायोगच होता तो, त्यावेळी त्याने पाहिले, तो "ती"च्याशी थोडा बोलला, अन् मग काय—हरपला देखील... यावेळी त्याचा आनंद द्विगुणीत होता, तो त्यावेळचे गुलकंदाने भरलेले सुखद क्षण आठवून-आठवून हर्षाने वेडापिसा झाला होता, कावरा-बावरा होऊन दिवास्वप्नांमध्येदेखील "ती"च्या सवे नांदण्याचे क्षण उपभोगत होता. पहिल्या प्रेमापेक्षा हे दुसरे प्रेम त्याला अधिक पटले. आतापर्यंत त्याने ही "बाब" कोणाकडेच बोलून दाखवली नव्हती किंवा तसे भावसुद्धा चेहर्‍यावर झळकू दिले नव्हते, यद्यपि, सगळ्यांना नसले तरी त्याच्या "जीवलग" मित्रांना मात्र त्याच्यात असा अचानक काय उत्साह संचारलाय हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्याने त्याच्या व "ती"च्या "त्या" दोघी जीवलग मैत्रिणींकडे मनातले भाव अगदी तन्मयतेने हळूवारपणे बोलून दाखवले. ऐकताच त्या दोघी तर डोळे विस्फारुन त्याच्याकडे तोंडाचा "आऽऽ" वासून बघत किंचित हसल्याच... दुसरा धक्का—त्यांच्याकडून कळाले, अरे बाबा, "ती"ला तीच्या घरी पाहुणे पाहून गेलेत, "ती"चं लग्न ठरलंय! तु खूप उशीर केलास रे... किऽतीऽ जड शब्द होते ते, त्याला त्याक्षणी ते पेललेच नाही. पुढे काही बोलायला उरलेच नव्हते, अनंत हुंदके भरुन आल्यामुळे कंठ दाटून आला होता, शब्दांना बाहेर पडायला जागाच उरली नव्हती, डोळे टचकन् पाणावले, तो तसाच कसाबसा घरी परतला. त्याच्या चेहर्‍यावर "विरहा"चे चिंतायुक्त भाव स्पष्ट झळकत होते. "त्या" दोघी व आणखी एका जीवलग मित्राने त्याला बरेच समजावले, विविधांगी पैलूंवर चर्चा-मसलत झाली, हे केल्याने काय होईल, तश्याने काय होईल, इत्यादी इत्यादी... त्याने "तीज"वर मनापासून अन् खरेखुरे प्रेम केले होते, तीच्या बाबतीत किंचितदेखील अनिष्ट वा "ती"ला थोडादेखील त्रास होईल, असं काहीही करण्यास तो तयार झाला नाहीच आणि कधीच तयार झालादेखील नसता... त्याला "ती"ची जास्त काळजी होती, आणि अखेर त्याने तेच केले, जे त्याला योग्य वाटले. "त्याग"...! हो, त्याग, दुसर्‍यांदा प्रचंड दुःख पचवत त्याने "त्याग" करण्याचा/पत्करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचे सारे पुलकित जीवन, जे त्याने मध्यंतरीच्या काळात आनंदाने जगले होते, ते सारे अंधुकमय झाले होते. नियती त्याच्याशी कसे हे "सुख-दुःखाचे खेळ" खेळते आहे, हे मंथन करतांना त्याला संदीप खरेच्या खालील कडव्यांची आठवण होई, जी त्याच्याबाबत घडत असलेल्या घटनेशी अगदी जुळत होती:

हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...


     मधल्या काळात त्याने कितीतरी कविता अवतरविल्या होत्या, पण या दुःखाच्या आक्रोशात त्या सर्व विरुन गेल्या, त्यामुळेच की काय आता त्याला इतरांच्या कवितांकडे बघावे लागत होते!

     त्याला अखेर ती बातमी कळाली, "ती"चे लग्न, हो लग्नच... पार पडणार आहे,पार पडत आहे, आनंदात पार पडले... त्याने सुटकेचा निःश्वास टाकला... त्याने त्यावेळी घेतलेल्या "त्यागा"च्या निर्णयामुळेच तो आज स्वतःला कोणाच्याही मदतीशिवाय सावरु शकत होता व यापुढेही त्याला तशी कोणाच्याही सांत्वनाची गरज भासणार नव्हती. त्याच्या "त्या" निर्णयामुळे "ती"ला त्याच्याकडून किंवा त्याच्यामुळे मुळात काहीच कष्ट वा त्रास झाला नाही व होणारही नाही, या भावनेनेच डोळ्यांत पाणी तरतरतं ठेऊन बळजबरीने तो हसण्याची जणू नाट्यमय-क्रिडाच करतोय व मनातल्या-मनात "क्षण" चित्रपटातले एक गाणे घोळत आहे:

जरी दूर तू गं, तरी ना दुरावा...
तुला आठविता, तुझा गंध यावा...
सुखाचा तुझा, गोड संसार व्हावा...
हीच प्रार्थना—ईश्वराला...


     स्वैर गुंफलेल्या नात्यांमधली गुंतागुंती त्याला आज उमगलीय, त्याने अनुभवलेल्या घटनांवरुन तरी तो आता बरंच काही शिकला आहे.

4 प्रतिक्रिया:

Deepak म्हणाले...

विशल्या,
हळु - हळु तू पण लेखकांच्या लायनीत येतोयस... सही लिहिलंयस!
अनामित म्हणाले...

विशाल मस्त लिहिलयेस.... मनापासून आवडलं...
Unknown म्हणाले...

किती छान मराठी लिहीतोस रे तु ? खुप दिवसांनी छान काहितरी वाचलं.
Rohi म्हणाले...

Tumcha tyag pahun ase vatale.....ki tumchya mate fakt milavane mhnje ch Prem Aahe. Khar Tar Jyaver aple Prem aahe ti Sukhat rahane hey imp aste. Jenekarun tumhi suddha samadhani asta. Tech tumhi kele tar yat tyag kasala ?

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre