मागे वळून पाहताना...

» बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

मागे वळून पाहताना...
मागे वळून पाहताना...

आत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला "नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्‍यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्याप्रमाणे मनाच्या अदृश्य पटलावर भरधाव वेगाने असंलग्न शृंखलेतील पताक्यांप्रमाणे अवतरायला लागली.

ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्या जीवनात काहीही न म्हणण्यापेक्षा "जैसे थे!" घटनांचा प्रभाव होता, असं माझं अन् माझ्या स्वार्थी मनाचं मत; याबाबतीत दोहोंपैकी का कुणाचं दुमत नाही, तेच उमगत नाहीये, असो. कॅन्टीनमध्ये साजरा केलेला वाढदिवस, त्यानंतर त्याच दिवशी रिजल्ट लागून फर्स्ट इयर क्लिअर केल्याची दूतर्फा आनंद देणारी बातमी; सगळं काही अगदी जसं हवं होतं तसंच घडलं. नंतरच्या काळात बाहेर भटकणं, बागडणं इत्यादी गोष्टी तर आल्याच. आमच्यासारख्या मतलबी लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही मिळणं वा तसं काही घडणं म्हणजे खूप अलौकिक बाब असते, हे सांगायला नको!

ऑगस्टच्या सुरुवातीलाच आजवरची सर्वात मोठी घटना घडली, अगदी आकस्मिकच म्हणता येईल; घटनेचा एवढा परिणाम झाला की मी स्वतः माझ्यात एकाएक झालेले परिवर्तन (चमत्कारिक बदल!) अनुभवले. गेल्या काही दिवसांपर्यंत त्या घटनेच्या वेळेपासून मिळालेल्या प्रचंड रेट्यामुळे मी प्रभावित झालेलो होतो, मात्र आता सरत्या काळानुरुप व इतर अनेक बाह्य बलांचा रोध सहन करीत तो प्रभाव ओसरत चाललाय; संपूर्णतः मावळणार मात्र नक्कीच नाही, हं कदाचित मीच स्वतः त्या गोष्टीसाठी कारणीभूत असेन. या मध्यंतरीच्या काळात मी अद्यतनीत केलेले वा लिहिलेले काही ठराविक ट्विट्स, लेखन इत्यांदीवरुन या उतार्‍याचे आकलन होऊ शकेल, असे मला वाटते. ;)

क्षणा-क्षणांत अनुभव लपलेले असतात, याच गत अनुभवांवरुन स्वतःला सुधारण्याची प्रवृत्ती माझ्या अंगी आहेच. शिवाय अनुभवांवरुन कुठलाही जीव शिकतो अन् त्याला हवे असलेले वा गरज असलेले बदल अंगिकारुन तो स्वतःचा उत्कर्ष साधत असतो; याची देखील मला प्रचिती आहे. या उक्तिंचे यापुढे अनुसरण करण्याचा माझा प्रयत्न असेल.

वर्षाच्या सरतेशेवटी अनेक गतकालीन घटनांच्या बेरीज-वजाबाकीची उकल नोंदवताना इतरांना नवीन वर्षाबद्दल शुभेच्छा दिल्यास स्वतःचा आनंद द्विगणित होतो अन् मन उल्हसित होते, याचा मला आत्ताच प्रत्यय आला; सो हॅव ए व्हेरी हॅपीऽ न्यू इ`यर टू ऑल ऑफ माइ ब्लॉग रीडर्स्! आपले प्रेम असेच दिवसेंदिवस वाढत राहील, ही सदिच्छा.

मागे वळून पाहताना
आठवतायत ते सुख-दुःखाचे अविस्मरणीय क्षण
मन अंतरी विव्हळववणारे
अशात नकळत गुलाब कधी उमलला
याची जाणीव देखील नव्हती
आपल्या आयुष्यात कधी असंसुद्धा घडेल
असं वाटलं देखील नव्हतं
असो, झालं ते गेलं
पण आठवणी मात्र राहिल्या
त्याच विचित्र आठवणींचा पूर आलाय आता
त्या फुलणार्‍या फुलाबरोबर जगताना
हं, सारं कसं असबंध वाटतंय आता
आज मागे वळून पाहताना...

2 प्रतिक्रिया:

Marathi Greetings म्हणाले...

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
आनंद म्हणाले...

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
खुसखुशीत आणि मजेदार लेखनाच्या प्रतीक्षेत ..

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre