यस्सऽ नोऽ...

» गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

[डिस्क्लेमर: पुढील कथानकातील कुठल्याही प्रसंगाचा/पात्राचा/स्थळाचा/वचनांचा कशाशीही कसलाही संबंध नाहीये. यातील "मी" हे पात्र देखील काल्पनिक आहे. कसल्याही बाबतील जर तुम्हाला हे तुमच्याशी घडलेल्या घटनेशी संबंधित आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.]

    पहिलंच लेक्चर... तसं सगळेच लेक्चर्स आम्ही म्हशीसारखे उदास मुस्कटं करुन कसे-बसे मार्गी लावत असतो, कुठलंही लेक्चर त्याला अपवाद नसतंच मुळी! आज मुलांना जरा हूरूपच चढलेला दिसत होता बहुदा, नाही नाही... मला तर दाट शंकाच होती की कित्येकांनी डायलूट (विरल ~ पिण्याच्या पाण्यात मिक्स करुन) ढोसलेली होती... खासकरुन आमचे एमबीबीएस (बॅक बेंचर्स हो!) इंजिनिअर्स...

    मॅऽमनी लेक्चरला सुरुवात केली... एखाद्यावेळी गच्चीवर रात्री झोपतांना १२ वाजता अतिशय कर्कश आवाजात बाजुच्याच मंदिरावरील खडूस पुजार्‍याने झोपेच्या सुरात म्हणलेली "वट पाहे सदना" च्या जागी "वाट पाही सजनी" अशाप्रकारची मॉडिफाइड स्वरूपातली गणपतीची आरती ऐकणं चालेल, पण मॅऽमचं लेक्चर म्हणजे वर्गांच्या खिडक्या डोक्याने आपटून-आपटून फोडाव्या की काय, अशी स्थिती निर्माण करणारं कंटाळवाणं पारायण...! असो... नशिबी पडलंय, ते भोगावं तर लागणारंच... अर्धा तास झाला, मॅऽमचं भारूड चाललंय, पोरा-पोरांची तोंड तर अशी दिसत होती की कोणी जोर-जोरात त्यांच्या थोबाडींत भडकावल्या असाव्यात... पिन-ड्रॉप-सायलेंट का काय जे म्हणतात ना, त्याचा आम्ही तना-मनाने अवलंब केलेला... फळ्यावर मॅऽमनी कसलातरी तक्ता काढला. तक्त्यात मॅऽमनी नावे विचारली... ज्याने-त्याने त्यांची -त्यांची सांगितली देखील. च्यायला, पहिल्या कॉलममध्ये मुलांची नावे भरल्यावर दुसर्‍या कॉलमकडे मॅऽम वळाल्या... मुलींची नावे विचारणं मॅऽमनी चालू केलं... पहिल्या बेंचपासून... हा हा... मनात नसूनही कित्येकींना त्यांची नावे सांगावी लागली. मुली सांगत होत्या, मॅऽम लिहित होत्या...
   
    या काळात जो व्हॅक्क्युम हशा (म्हणजे हसणं, पण मुखरे-मुखरे, फार आवाज न होऊ देणं, एवढाच त्यामागचा उद्देश्य!) वर्गात पिकला होता, काय सांगावं... पहिल्या मुलाच्या नावासमोरील फिल्डमध्ये जेव्हा पहिल्या मुलीचे नाव आले, तेव्हा पासूनच खळखळाट सुरु झाला होता... पोरगा खल्लासच झाला... टॉपर अन् त्यात क्लासमधली सगळ्यांत क्लास(!) पोरगी त्याच्यासमोर, म्हणजे काय प्रत्यक्षात त्याच्यासमोर नव्हे तर तीचं नाव त्याच्या नावासमोर...! कॉन्ग्रॅट्स... कॉन्ग्रॅट्स... आम्हा बॅक-बेंचर्सकडून शुभेच्छांचा त्याच्यावर काही काळ अविरत वर्षाव चालू होता... पण मॅऽम लय म्हणजे लयच स्ट्रिक्ट... आधी त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली, नाही फर्मानच सोडला, जो बोलला/बोलली, तो/ती क्लासच्या बाहेर... यानंतरची वेळ असते ती म्हणजे व्हॅक्क्युम हशा क्रिएट होण्याची, साहजिकच आहे... शेजारच्याशी/चीशी खाली मुंडकी वाकवून या आजच्या प्रकरणाबद्दल कुजबुज सुरू झाली. मुलींची नावे येत गेली, तसा आमच्या साइडने व्व्यॉऽऽक, व्वॉऽऽव्व, श्शीऽऽ, हात्तीऽऽच्च्या मारी.. अशा प्रकारच्या नॉन-सेन्स अन् मिनिंगलेस कमेंट्स पास होत गेल्या... त्याही उघड-उघड! दहा मिनिटांत तक्ता पुर्ण झाला... एक सांगायचेच राहिले की... ते जे दोन कॉलम्स तयार केले होते, त्यांमध्ये काही प्रमाणात मोकळी जागा होती... माझी नजरच कमी... चष्मा लागलेला असेल बहुतेक, पण मी हट्टी... चष्मा घालून 'बॅटरी' सारख्या फालतू टवाळक्या ऐकण्याची घोडचूक आपुण कधी करणार नाही बुवा... आणि मागे बसलेलो असल्यामुळे फळ्यावर काय लिहिलेले/काढलेले असेल, ते अंदाज बांधत-बांधत (पोरींकडेही असेच अंदाजपंचे डोळे मारण्याचे उपक्रम मी कधीकाळी केले असल्याचे मला आठवते अजून!) समजून घ्यावे लागते मला... चुकी झाली... ते दोन भिन्न तक्ते होते, हं, भिन्नच होते, खात्रीने... एकाच तक्त्याचे दोन कॉलम्स नव्हते हे लक्षात घ्या आता...! :P

    इथून पुढे खरी मजा येणार होती... आतापर्यंत लेक्चर चालू होऊन ४० मिनिटे झाली असावीत. मॅऽमनी दोन्ही तक्त्यांतील फिल्ड्समधून तिरपे-तारपे बाण रेखाटीत जोड्या जुळवायला सुरुवात केली... च्यायला... आता हसू आवरणं अतिशय कठिण... पहिल्या वेळी कॉन्ग्रॅट्स सारख्या शुभेच्छा मिळवणारा पोरगा सोडून सगळ्यांच्या जोड्या मॅऽमनी जुळवल्या... काय इज्जत उरली असेल त्या पोराची...! नाइंसाफीच म्हणावी लागेल, काडी असलेल्याच्या (नुसत्या हाडांचा!) चार-चार पोरींशी जोड्या...! साफ नाइंसाफी... लग्गा, लग्गा (म्हणजे फिक्सिंग हो, किरकेट मंधी होते ना तसला काहीसा प्रकार!) अशा भेसड्या आवाजाने क्लास दणाणून निघला! २ मिनिटे... मॅऽमनी आता बोलायला सुरूवात केली... सगळे चिडीचूप!

    मॅऽमने लेक्चरच्या सुरूवातीला कार्डिनॅलिटी—सेट रिलेशनशिप (विषय-संदर्भ: डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम!) बद्दल ज्ञानार्जन वाहिलं होतं, पण आधी सांगितल्याप्रमाणे कोणीच ते ऐकलेलं नसावं, हे मात्र पक्कं! आता मॅऽम त्या जोड्यांकडे बोट दाखवून सांगत होत्या, पोरं-पोरी तसाच उत्स्फूर्त प्रतिसादही देत होती:


    "धिस इज नोन टू बी वन टू वन रिलेशनशिप"
    "यस्सऽ... यस्सऽऽ"
    "धिस इज वन टू मेनी"
    "नोऽ नोऽ..."
    "अॅण्ड धिस इज मेनी टू वन"
    "चऽऽक... चऽऽक.. नोऽ.. यस्सऽ... यस्सऽऽ.."
    "फायनली, धिस हॅविंग नो रीलेशनशिप विथ एनिवन अमंग दि सेकंड टेबल, राइट?"
    "हा... हा... यस्सऽ... यस्सऽऽ..."
   

5 प्रतिक्रिया:

सिद्धार्थ म्हणाले...

वर्गात "वन टू मेनी" आणि "मेनी टू वन" शिकवताना वातावरण कसं तापलं असेल ह्याची चांगलीच कल्पना आली. मस्त लिहलं आहेस. मज्जा करून घे कॉलेजच्या दिवसांची.
♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ म्हणाले...

विषय कुठला होता ???? :?
आनंद म्हणाले...

छान अनुभव मांडला आहेस मित्रा ..
DhundiRaj म्हणाले...

अस्खलित.....................!!!
tejas.chimate म्हणाले...

मस्त ज्ळलय बग.....!!

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre