अशीही एक लव्ह स्टोरी - भाग १

» गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

कथालेखन आणि त्यात प्रेमकथेसारख्या अत्यंत अवघड विषयाशी निगडित लेखन करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न...! असो... बर्‍याच विषयांशी संबंधित लेखन तर मी नेहमी करतो, पण त्याला पुर्णत्वास नेणं म्हणजे जीवावर येण्यासारखं काम... बघूयात, ह्या कथेचा शेवट तरी व्यवस्थित होतो का ते... शिवाय बर्‍याच... नाही, फारच दिवसांनंतर ब्लॉगवर काही लिखान करण्याचा आज योग आलाय, हीदेखील चांगली गोष्ट म्हणावी लागेल, नाहीतरी माझ्या कित्येक ब्लॉगर-मित्रांनी विशल्याच्या "सुरूवात"चा शेवट झाला की काय, अशी शोकांतिका (वा अफवा म्हणा!) गेल्या काही दिवसांपासून पसरवण्यास सुरूवात देखील केलेली होती... त्यांच्यासाठी मी जीवंत असल्याची ही पोच-पावती! (राग नका येवू देऊ हो!)  ;)


[डिस्क्लेमर: ही एकूणच कथा, यातील पात्रे, पात्रांची नावे, ठिकाणे, प्रसंग इत्यादी सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. जर तुम्हाला कुठेही तुमच्या आयुष्यातील घटनांशी मिळते-जुळते प्रसंग आढळले, तर तो निव्वळ योगा-योग समजावा.]


----

"तुझ्या डोळ्यांत मला आभाळ दिसतं... तू असतेस तेव्हा मला कसं अगदी तुझ्या प्रितीच्या गार तुषार-सरींखाली मनसोक्त भिजल्यासारखं वाटतं... पण तू जेव्हा नसतेस ना जवळ, तेव्हा मात्र मी अगतिक होतो, कासावीस होतो... मला तुझ्याशिवाय क्षणभरही राहावत नाही प्रिये... हंऽऽ खरंच राहावत नाही गं..." राहूल अत्यंत भावविभोर होऊन स्वप्नरंजित शब्दांत काव्यमय पद्धतीने त्याच्या मनातले भाव अनिताच्या कानी ऐकवत होता.

    वेळ संध्येची... रस्त्याच्या बाजूला असलेल्या कट्ट्यावर ती दोघं बसलेली होती. रस्त्याचे जरी डांबरीकरण झाले असले तरी तो शहराबाहेर अंदाजे १५ किमी दूर असलेल्या एका खाजगी शाळेला मुख्य रस्त्याशी जोडणारा जोडरस्ता होता. शाळेला हल्ली सुट्ट्या असल्याने राहूल अन् अनिताला मनमुराद अशी ती जागा होती... क्वचितच कोणी फिरकत होतं तिकडे, त्यामुळे बरेच दिवसांनंतर भेटीसाठी आसुसलेल्या या जोडप्याला आज एकमेकांस कडकडून भेटण्याची इच्छा न झाली तरच नवल... पावसाळ्याचे दिवस असल्याने आभाळ भरगच्च अशा काळ्याकुट्ट ढगांनी सर्वत्र भरलेले होते. गेल्या अर्ध्या तासापासून अगोदर वाहणारा मंद वारा आता जरा आणखी सुसाट्याने वाहत होता. ह्या वर्षीचा तो पहिलाच पाऊस होता. अगोदरच २ महिने उलटून गेलेले तरीही पावसाची नुसती चाहूल देखील नव्हती, पण आज मात्र ढगांचा गलबलाट अन् वीजांचा एकसंध कडकडाट ऐकून तहानलेली धरणी निश्चितच सुखावली असेल...


    ----


    याच दिवशी, म्हणजे १७ ऑगस्टला ती दोघे एक-मेकांना एका पुस्तक प्रदर्शनात भेटली होती. खरे पाहता, ते दोघे एकाच वर्गात शिकणारी, म्हणजे अभियांत्रिकीच्या माहिती तंत्रज्ञान शाखेत द्वितीय वर्षात शिकणारी मुलं... पण आजवर त्यांना एकमेकांशी काही खास कारणास्तव बोलण्याचासुद्धा योग आलेला नव्हता. भेटी तर नेहमीच होतात, पण ही भेट त्यांच्या आयुष्यातल्या सर्वांत अनमोल व सुखद क्षणांची घटना ठरली होती. राहूल आधीपासूनच पुस्तकांची चाळाचाळ करण्यात मग्न होता. काही वेळातच अनिता तेथे येऊन धडकली व तीही पुस्तकं बघू लागली. तो तीला नावाने ओळखून होता, पण तिच्याशी काहीतरी सबब पुढे करुन बोलण्याचे धैर्य त्याच्याकडून होत नव्हते. अनिता दिसायला तशी सालस, करुण, सुंदर, गोर्‍या वर्णाची व काळेभोर लां केस असलेली देखणी युवती होती. राहूलने तीला ज्यावेळी प्रथम पाहिले होते ना, त्यावेळीच तो तीच्यावर फिदा झाला होता. त्याला नेहमी वाटे की, तीच्याशी काहीतरी बोलावं, पण गेल्या वर्षभर तरी त्याने तसा प्रयत्न देखील करुन बघितला नव्हता. उलट त्याला ती दुसर्‍याच कोणासोबत गुंतलेली असेल, असे वाटे... एरवी, त्याची उपस्थिती अनिताला समजली होती, तरीही तीने पुस्तकं चाळण्याचं तीचं काम चालू ठेवलं... तीलादेखील तो वर्गात आहे म्हणून माहिती होती, पण त्यावर अधिक जाणून घेण्याचा तीनेदेखील कधी प्रयत्न केला नाही व तसं करण्याची गरज देखील तीला यापूर्वी कधी वाटली नव्हती. दोघेही विरुद्ध दिशेकडून होते, व हळूहळू एकमेकांकडे येत होते, बहुदा त्यांना त्या गोष्टीची जाणीव नसावी. कवितेचे एक पुस्तक दोघांनीही नकळत एकाच वेळी उचलले अन् जे व्हायचे नव्हते ते झाले... राहूलकडून पुस्तकाची समोरची बाजू व पहिली काही पाने तर अनिताकडून अर्ध्यापासून मधली पाने हाती लागली, हे नकळत झाल्याने दोघांकडूनही ते पुस्तक त्यांनी आपापल्या दिशेने ओढले... एखाद्यावेळी जर पुस्तकाची बांधणी जर व्यवस्थित असती तर त्याचे तुकडे झाले नसते, पण निकृष्ट दर्जाची बांधणी अन् कमी दर्जाचा कागद असल्यामुळे त्या पुस्तकाचे दोन तुकडे झाले व काही पाने अस्ताव्यस्त फाटली गेली. ताड्कन तेथील समोरच्या टेबलापाशी बसलेला एक कारकूनवजा अधिकारी आणि पुस्तके वाचण्यात दंग झालेले इतर काहीजण त्यांच्यापाशी एकमेकांशी नाहक कसलीतरी गलबला करीत आले. एव्हाना राहूलने ते पुस्तक जरा व्यवस्थित करुन जिथून उचलले होते त्या जागी ठेवण्याच्या तो तयारीत होता, पण त्या कारकूनवजा अधिकार्‍याने त्याच्याकडून ते हिसकावून घेतले. त्यावेळी राहूलच्या चेहर्‍यावरील भाव तसे पाहणार्‍याला चकित करुन टाकणारे होते, कारण तो इतरांकडे पाहतच अशा पद्धतीने होता की जसे काहीच झालेलं नाही... पण निःशब्द प्रदर्शन कक्षात पुस्तकाच्या फाटण्याचा आवाज थेट कक्षाच्या दरवाज्यापर्यंत ऐकू गेलेला होता. अनिता मात्र एवढी घाबरलेली होती की तीला आता फक्त रडूच कोसळायचं शिल्लक राहिलेलं होतं...

    "तुम्ही कॉलेजकुमार कारटी म्हणजे..." काहीशा आचरट भाषेत तो अधिकारी राहूल अन् अनिताकडे त्याचा करडा रागीट चेहरा दाखवून त्यांना खडसावत होता.
   
    "असू द्या हो... उलट आजकालची मुलं-मुली अशा प्रदर्शनांकडं फिरकत देखील नाहीत, ही गोंडस मुलं इकडं आली हीच मोठी गोष्ट आहे आपल्या संस्कृतीसाठी..." एक वृद्ध आजोबा त्या अधिकार्‍याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते.
   
    "नाही, ते काही नाही... हे पुस्तक यांच्याकडून फाटलंय त्यामुळे त्यांना त्या पुस्तकावरील किंमतीएवढी रक्कम जमा करावी लागेल..." वृद्ध आजोबांचे वाक्य मध्येच तोडीत तो अधिकारी उत्तरला.
   
    "किती द्यायचे मग?" राहूलने खिशात हात घालीत त्या अधिकार्‍याला तावातावात विचारले. त्याला राग येणे साहजिकच होते, कारण काही क्षणांपूर्वी तो अधिकारी त्याला व अनिताला काही-बाही बोलला होता त्यामुळे निश्चितच त्याचा राग अनावर झाला असला तरी संयम बाळगून त्याने चेहर्‍यावरील हाव-भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला.
   
    "एकशे वीस रुपये!" त्या फाटलेल्या पुस्तकावरील किंमत बघण्यासाठी पाने चाळीत तो अधिकारी राहूलकडे डोळे वटारीत बोलला.
   
    अनिताने लगेच बाहेर ठेवलेल्या तीच्या पर्सकडे धाव घेतली. राहूलने पैसे काढून द्यायच्या आत स्वतः द्यावयाच्या उद्देशाने ती प्रदर्शन-कक्षाच्या बाहेर पळतच गेली. लोकांनी पुस्तकं चोरून सोबत घेऊन जावू नयेत म्हणून प्रदर्शन कक्षाच्या बाहेरच लोकांनी आपापल्या पिशव्या, बॅग्ज इत्यादी ठेवाव्यात, असा नियम होता. आजही ऍडमिशन न झाल्यामुळे ती घरी जाण्याच्या तयारीत होती, पण वाटेतच तीला हे प्रदर्शन दिसले. अगोदरच्या दिवशीही ती तेथे येऊन गेलेली होती. त्यामुळे आधीच्या दिवशी न पाहिलेली पुस्तकं आज पाहायची, आणि पुस्तक-वाचनाची तशी फार आवड असल्यामुळे तीने घरी न जाता प्रदर्शनातच थोडा वेळ घालवण्याचा विचार करुन ती इथे आली होती, अन् वरील प्रसंग तीच्यासोबत अनासयाने घडला होता. ती पर्स लगबगीने धुंडाळीत होती, पण काही केल्या तीला तीची पर्स सापडत नव्हती. तीने सर्व पाहिले पण तीला काही केल्या पर्स मिळेना, शेवटी वैतागून तीने त्या अधिकार्‍यालाच हाक मारली, व विचारले,
   
    "अहो काका, मी इथे येतेवेळी पर्स ठेवली होती, ती मिळत नाहिये... प्लीज, बघा ना एकवेळ..."
   
    आतापर्यंत राहूलने मोजून एकशे वीस रुपये त्या अधिकार्‍याच्या हवाली केले होते व ते फाटलेले पुस्तक स्वतःजवळ घेतले होते... अनिताची हाक ऐकताच अधिकारी अन् तो अनितापाशी धावले... सगळीकडे शोधाशोध करुन झाल्यावर अनिताचा चेहरा एकदम व्याकूळ झाला व ती रडक्या अन् दबक्या आवाजात राहूलच्या कानात पुटपुटली,
   
    "अरे राहूल... कॉलेजहून इकडे येण्याअगोदर, माझी मैत्रीण सुमेधासोबत मी, श्री कॅफेटेरीयामध्ये कॉफी प्यायले होते, आणि बहुतेक तिथेच मी माझी पर्स विसरलीय... आणि खरं सांगायचं झालं तर पर्समध्ये तीस हजार रुपये आहेत..." ती कितीही दबक्या आवाजात बोलली असली तरी, तीचा आवाज राहूल व्यतिरिक्त नजिकच्या बर्‍याच जणांपर्यंत पोहोचला होता... पण तीस हजारांचा आकडा ऐकताच सर्वांनी मौन पाळणेच योग्य समजले असावे.
   
    "काऽऽयऽऽ? तीऽऽस हजार रुपये?" राहूलची तर बत्तीशीच बसायची बाकी होती...
   
     "चल पटकन..." प्रदर्शन-कक्षाच्या बाहेर ठेवलेली आपली कॉलेज-बॅग गळ्यात अडकावित त्याने त्याच्या बाइकची किक मारीत अनिताला मागे बसण्यासाठी खूण केली. अनिताचा कंठ दाटून आला होता, साहजिकच डोळ्यांत पाणी आल्यामुळे तीला सर्वकाही अस्पष्ट व अंधुक दिसत होते... कशीबशी ती राहूलच्या पाठीमागे स्वतःला थोडंफार सावरुन बसली. आता काहीही बोलण्याची तर तीच्यात शक्तीच उरली नव्हती...

     राहूल जमेल तेवढ्या भरधाव वेगाने श्री कॅफेटेरीयाकडे बाइक हाकत होता. त्यांचा कॉलेजला लागूनच ते कॉफीसाठीचे शहरातील एक नावाजलेले रेस्टॉरंट होते. तथापि, तेथील मालकाशी राहूलचे संबंध तसे चांगले होते. काही मिनिटांतच ती दोघे कॅफेटेरीयासमोर येऊन दाखल झाली. राहूलने लगेच गाडी हाफ स्टँडवर पार्क करुन कॅफेटेरीयात धाव घेतली... अनितासुद्धा त्याच्या पाठोपाठ पळतच गेली. जिथे ती व तीची मैत्रीण सुमेधा बसल्या होत्या, तिथे ती गेली... पण तिथं काही तीला पर्स आढळली नाही. तीने लगेच सुमेधाला फोन करुन विचारण्याचा प्रयत्न केला की, तीने तर पर्स सोबत नेली नाहिये ना... पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सुमेधाकडून नकारार्थी उत्तर मिळताच राहूल काउंटरपाशी गेला व त्याने कॅफेटेरीयाच्या मालकाकडे त्याबद्दल विचारणा केली. झाला प्रकार कॅफेटेरीयाचा मालक पाहतच होता, अन् त्याने अनिताला ओळखले देखील होते. राहूलशी त्याचे संबंध जरा चांगले असल्याने त्याने राहूलचे बोलणे व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकले. अनिता राहूलच्या मागेच उभी होती... तीने देखील बोलण्याचा प्रयत्न केला, पण तीच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते... कॅफेटेरीयाच्या मालकाने लगेच अनिताची पर्स राहूलच्या हाती दिली, अनिताने पर्स राहूलच्या हातात असतानाच पर्सची चैन उघडून त्यामधून एका प्लास्टिकच्या पिशवीत दूमडून ठेवलेले बंडल काढले अन् ते राहूलच्या हाती देत पर्स स्वतःकडे घेतली. राहूलने त्या प्लास्टिकच्या पिशवीतून नोटांचे बंडल काढून अधाश्यासारखं मोजण्यास सुरूवात केली.
    
     "हुश्शऽऽ... बरोब्बर आहेत... हे घे..." हसर्‍या चेहर्‍याने अनिताकडे पाहत तीला त्या नोटा देत राहूल उत्तरला. गेल्या अर्ध्या तासाभरापासून गंभीर भाव असलेल्या त्याच्या चेहर्‍यावर एकदम काही कोटींचा खजिना हाती लागावा, त्यावेळी जसा अत्यानंद होत असेल, तसे भाव त्याच्या चेहर्‍यावर झळकले.
    
     "यापूर्वीही अशा वस्तू विसरण्याच्या अनेक घटना आमच्या कॅफेटेरीयामध्ये घडल्या आहेत... पण मी आणि येथील सर्व कर्मचारी आमच्या कामाशी प्रामाणिक आहोत. माझ्याजागी जर दुसरा कोणी असता, तर त्याने निश्चितच तुमची बॅग दिली नसती... आणि खरं सांगायचं म्हणजे, मला किंवा इथल्या कोणालाही याबद्दल मुळीच माहिती नव्हती की तुमच्या या बॅगमध्ये एवढे पैसे आहेत म्हणून... असो... तुम्हाला आतापर्यंत फार त्रास झाला असणार, झाल्या प्रकाराबद्दल..." कॅफेटेरीयाचा मालक अत्यंत सौम्य व विनम्र भाषेत बोलत होता. तिथे बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आणि इतर गिर्‍हाईकांना झाला प्रकार समजण्यास फार वेळ लागला नाही. कॅफेटेरीयाच्या मालकाचे वरील उद्गार ऐकताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाटाचा त्याच्यावर वर्षाव केला,
     राहूल व अनितानेही कॅफेटेरीयाच्या मालकाचे व इतर कर्मचार्‍यांचे आभार मानले व ते तिथून बाहेर पडले. तीला आतातर रडू आवरणे अवघड झाले होते. तीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू बाहेर पडत होते. यावेळी राहूलने बाइकवर बसण्यासाठी तीला कसलीही खूण केली नव्हती वा तो तसं बोललाही नव्हता, पण कोण जाणे, ती त्याच्या त्याच्या पाठीमागे बाइकवर विराजमान झाली...

     राहूलने बाइक शहराच्या बाहेर जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या दिशेने वळवली. राहूलच्या मनात गेल्या तासाभराचे चित्र खेळू लागले. पुस्तक प्रदर्शनात अनिताचं येणं, त्यानंतर पुस्तक फाटण्याचा विस्मयकारी प्रसंग, नंतर पैसे देण्यासाठी आपल्या पर्सकडे धावलेली अनिता, मध्यंतरी तेथील अधिकार्‍याशी झालेली वादावादी, अनिताची पर्स हरवल्याची बातमी कळणं, तीचा त्यावेळचा रडका चेहरा, नंतर तीचं त्याच्या पाठीमागे बाइकवर बसणं, कॅफेटेरीयातील ताज्या घडामोडी.... सर्वकाही आठवून राहूल स्वतःशीच स्मीत करीत मिश्किलपणे जोरजोरात खिदळत होता. अनिताचं रडणं आता जरा कमी झालं होतं, साहजिकच होतं म्हणा ते... राहूलही जाणून होता, त्याने शहराच्या बाहेर असलेल्या एका शाळेकडे जाणार्‍या रस्त्याकडे त्याची बाइक वळवली. अनिताचे रस्त्यावरील रहदारीकडे फारसे म्हणण्यापेक्षा मुळीच लक्ष नव्हते. तीने राहूलच्या पाठीवर तीचा उजवा गाल, कान दबेल अशा स्थितीत स्वतःला झोकून दिलं होतं... कॅफेटेरीयापासून शहराच्या बाहेर येईपर्यंत तीने याच स्थितीत राहूलच्या पाठीवर उसासे सोडले होते. पहिले-पहिले तर राहूलही झाला प्रकार पहिल्यापासून आठवण्यात गर्क होता, त्यामुळे त्याला तीच्या उसासे टाकण्याच्या गोष्टीबद्दल जराही संवेदना जाणवल्या नाहीत... पण नंतर शाळेकडे गाडी वळवतांना त्याला त्याची पाठ ओली झाल्याचं जाणवलं व ती कशाने झाली असणार हे देखील कळालं... तो हसतच अनिताला म्हणाला,
    
     "अगं आधीच एवढी थंडी वाजतीय, अन् त्यात तू रडून-रडून माझी पाठ ओली केलीहेस बघ... शिवाय तुझ्या मोत्यांसारख्या टपोर्‍या अश्रुंनी माझ्या शर्टावर किती सुंदर नक्षी बनली असेल नाही... माझ्या आईला फार आवडेल बघ... उद्या त्याच ठिकाणी पाठीवर धपाटे खाऊन यावे लागेल मला, आईच्या हातचे..."
    
     हे राहूलचं बोलणं ऐकून, न राहावून अनितादेखील हसायला लागली अन् हसतच त्याच्या पाठीवर झोकून दिलेले आपले मुंडके हटवून हलकेच बुक्क्यांचा मारा करीत ती म्हणाली,
    
     "चल चावट कुठला... एखाद्या रडक्याला हसवण्याचं काम तुला फार छान जमतं रे..."
    
     "ह्म्म, तेवढंच जमतं मला फक्त..." राहूलने अनिताच्या म्हणण्याला दुजोरा दिला व दोघेही हसायला लागले.
    
     संध्याकाळचे चार वाजून गेले होते, अन् शिराळ असल्याने उन्हाचा त्रास नव्हताच... शिवाय तेथील त्या शाळेला काही कारणास्तव त्या दिवशी सुटी होती... राहूलच्या तर मनासारखं झालं होतं आणि होत होतं आज सगळं... रस्त्याच्या बाजूला असलेल्या कट्ट्याजवळ राहूलने बाइक पार्क केली. दोघेही त्या कट्ट्यांवर जाऊन बसली अन् एकमेकांकडे चेहर्‍यावर स्मीत आणून एकटक पाहू लागली... आता हे देखील साहजिकच आहे, सुमारे १० मिनिटं ती दोघं नुसतं हसत होती, एकमेकांकडे पाहून... झालं, साडेचार वाजण्याच्या सुमारास राहूल एकदम उठून उभा राहिला व तीच्यासमोर दोन्ही पायांच्या गुडघ्यांवर वाकून तीला म्हणाला,
    
     "ए अनिता... तू खूप सुंदर आहेस अगदी रतीप्रमाणे, असं वाटतं की तुझ्याकडे नुसतं पाहतंच राहावं... मला तू खूप खूप आवडतेस... मी तुझ्यावर आजवर जरी प्रेम करीत नसलो, तरी आतापासून यानंतर मात्र अखेरपर्यंत जीवापाड प्रेम करीन. तुझ्यासाठी वाट्टेल ते करीन, प्रसंगी प्राणही देईन. तू माझी होशील का गं?"
    
      तो होकाराची वा त्याच्या म्हणण्याला दुजोरा तरी मिळेल या भावनेने, तन्मयतेने अनिताकडे एकटक पाहत होता.
     क्षणभर त्याच्याकडे शांत मुद्रा ठेऊन अनितासुद्धा पाहत राहिली व नंतर तीही त्याला म्हणाली,
    
     "अरे हो रे... मी तुझीच आहे व राहीन... त्यात विचारण्यासारखं काय एवढं... मी तर माझं सर्वस्वच तुला अर्पण केलंय... तुझा माझ्यावर संपूर्ण अधिकार आहे आता... पण फक्त माझी एक विनंती आहे ती तू मान्य केलीस तर फार छान होईल..."
    
     "बोल गं प्रिये... तुझं काहीही ऐकायला मी तयार आहे..."
    
     "आपण आज पहिल्यांदाच असं भेटतो आहोत... माझ्यामते व बहुदा तुलाही असं वाटत असेल, की आपण एकमेकांना जाणून घेणं फार फार गरजेचं आहे. वाटतंय ना?"
    
     "ह्म्म, बरोबर बोलतीहेस तू... पटतंय मला तुझं... मग काय करायचं ठरवलंहेस तू?"
    
     "आपलं एकमेकांवरील प्रेम कधीच कमी होणार नाही, तशी त्याची सर्व काळजी आपण दोघंही आपापल्या परीने घेत जावू... आतापासून ते आपली डिग्री मिळेपर्यंत म्हणजे तब्बल तीन वर्षे आपल्या एकमेकाच्या सानिध्यात राहून जाणून घेता येईल... चालेल?"
    
     "चालेल..."
    
     "नंतरचा विचार आपण याच तारखेला, याच ठिकाणी, तीन वर्षांनंतर बसून करूयात, ठिक?"
    
     "हो गं बाई... मंजूर... जशी राणीसाहेबांची आज्ञा..."
    
     संध्याकाळचे ५ वाजून गेले तरी अजुनही त्यांचं दिवसभरातील झालेल्या एकन्-एक प्रसंगांवर हसणं काही आवरत नव्हतं...

     ----

     आज त्याच कट्ट्यावर, त्याच तारखेला म्हणजे, १७ ऑगस्टला, तीन वर्षांनंतर ती दोघं भेटून भावी आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी पुन्हा एकत्र आली होती..



(क्रमशः)


8 प्रतिक्रिया:

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

अरे एवढ्या लवकर समाप्त करायची गरज नह्वती अजून लिहिता आले असते असे मला वाटते

असो खूप चांगला प्रयत्न आहे आशा करतो आम्हाला अजून असेच चांगले वाचायला मिळेल :)
Deepak म्हणाले...

मस्तच रे!
आता ब्लॉगर्सनाही "लेखक" म्हणावे लागले तर.. अतिशोक्ति ठरु नये!

लिहित रहा!
अनामित म्हणाले...

मस्त जमवली आहेस...
Yogesh म्हणाले...

चांगली जमली आहे...लगे रहो.. :) :)
Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

विशल्या, स्टोरी मधे खूप पोटेन्शिअल आहे. वेळ काळ यांचं गणित जमवून कन्टेन्ट वाढवलंस तर मस्त प्रेमकथा होईल.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@ कांचन ताई,
क्रमश: केलीय स्टोरी... :)
अनामित म्हणाले...

विशाल छानच जमतीये रे कथा,लिही अजुनही!!! :)
Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

क्रमश: आहे तर मग मस्तच! अजून खुलवून लिहिता येईल. शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre