हं, तर नवीन वर्षाला सुरुवात झालीय म्हणायची. गेल्या दशकात अशा कित्येक महत्वपूर्ण घटना तुमच्या आयुष्यात घडून गेल्या असतील ज्यांमध्ये तुमचा राहिलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग तुम्ही हयात असेपर्यंत कधीच विसरु शकणार नाहीत. बहुतेकदा अशा घटनांच्या परिणामांचे स्वरुप—प्रचंड आनंद, रंगतंद्रीमय सुखातिरेक, भयानक, पार दुःखाच्या डोहात बुडल्याची जाणीव, भावशून्यता, नैराश्य असे काहीसे असते. अशा गोष्टींबद्दल विचार करताना मग लगेच असा प्रश्न किंबहुना मस्तकी चमकून जातो की या सर्व गोष्टींमागचे कारण तरी काय, का असे अनुभव अनुभवायला मिळतात, कशामुळे? विचार करायला बसले की अनन्य प्रश्न समोर उभे ठाकतात आणि ते तुम्हाला स्वतःला उत्तरे माहित नसताना देखील एकामागोमाग एक अशा प्रकारे मुळ प्रश्नाला लागूनच असलेल्या अतिशय कठिण प्रश्नांचा भडिमार तुमच्यावर करण्यास सुरुवात करतात. हीच बाब माझ्या बाबतीत घडली. नववर्षाचा रम्य स्वागत सोहळा अनुभवण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतोच. आता केवळ काही दिवसांच्या सुट्ट्यानंतर चालू होणारे सेमिस्टर माझ्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे याची पुरती जाणीव मला झालेली आहे, अन् त्याचाच परिणाम म्हणजे गत घटनांपासून, पूर्वी केलेल्या गत कर्मांपासून काही तरी शिकायचे—अशी बनलेली मानसिकता; झाले "मी पणा"चे भान देखील मी विसरत गेलो, निराशेचे सूर माझ्या एकूणच हालचालींवरुन समोरच्याला स्पष्ट दिसत असावेत. ही बाब बहुतेकांनी हेरली, सोमेश दादाने याची दखल घेत मला "रँडी पॉश् " या आजतागायत मला माहित नसलेल्या व्यक्तिबद्दलची व त्यांच्या लेक्चर्सविषयी माहीती पुरविली. सोमेश दादाला तुम्ही [या ] त्याच्या संस्थळावर त्याने अतिशय काळजीपूर्वक व अभ्यासपूर्वक पद्धतीने बनवलेल्या माइंड मॅप्सवरुन बहुधा आधीपासूनच ओळखत असाल.
अवघ्या काही तासांतच मी रँडी पॉश् यांचा चाहता झालो. अगदी साध्या-साध्या घरगुती उदाहरणांचा प्रत्यय देत त्यांनी आजवर लक्षावधी लोकांच्या जीवनात हर्ष रुपी बीजे पेरण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे, पॉश् हे स्वतः संगणक क्षेत्रातील प्रख्यात अभियंते आहेत; त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचे प्रभावी वक्तृत्व व संभाषण कौशल्य—ऐकणाऱ्या रसिक श्रोत्याला हसवत-खेळत ठेऊन मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्याकडे अथांग शक्ती आहे. पॉश् यांच्याबद्दल अधिक माहीती गोळा करीत असताना त्यांचे "टाइम मॅनेजमेंट "वरील लेक्चर पाहण्यात आले, एकूणच एन्जॉय करण्यासारखे आहे ते! या लेक्चरमधील त्यांनी समजावलेले "स्टीफन कॉव्हेचे फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स" मला अधिक भावले. वरील परिच्छेदातील सुरुवातीच्या ओळींत ज्या प्रश्नांचा मी उहापोह केला आहे, त्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे शोधण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन आपल्या हाती लागले आहे, अशी मला पक्की खात्री झाली.