आम्ही "शिरसोली"ला (ता/जि. जळगाव) होतो, ते जळगावपासून १० किमी लांब होते. अन "पद्मालय" (ता. एरंडोल, जि. जळगाव) हे जळगावपासून ४०-४२ किमी दूर आहे. म्हणजे आम्हाला तरी पण ३० ते ३२ किमी जायचे होते. जातेवेळी रस्त्यात गाडी पेट्रोलची टंकी फुल केली. साला रस्ता एकदम हाय-वे टाईप अन रस्त्यावर एवढी वर्दळ पण नव्हती, पण प्रविण भाऊजींची "हिरो होंडा करिज्मा" ३०-४०kmph च्या पुढे जातच नव्हती, अन अनिल भाऊजींची (ज्यांच्या पाठीमागे मी बसलो होतो), "हिरो होंडा स्प्लेण्डर प्लस" ७०-८०kmph या स्पीडने पळत होती. आम्ही पाच-पाच मिनिटांनी मागे वळून पाहू, तर ते आम्ही एखाद्या ठिकाणी थांबल्यावर दहा-एक मिनिटांनी दिसत होते, अन गाडी चालवत असतांना तर ते आम्हांला दिसतच नव्हते, एवढी त्यांची करिज्मा "फास्ट" पळत होती.....!
आम्हाला निघून तरी पण बहुतेक एक तास झाला होता. तसं ३० किमी आम्ही अर्ध्या तासात पार केलं असतं, पण प्रविण भाऊजींच्या करिज्माने तर नुसता वैताग आणून सोडला होता. गौरव त्यांच्या पाठीमागे बसला होता, त्यामूळे मला त्याचं हसू येत होतं. वाटेत एक मोठी नदी (इंद्रायणी) होती, खूप भव्य होती, पाणी तसं कमीच होतं पण पुलावरून जाणारी पाईप-लाईन एका ठिकाणी फूटलेली होती, गाडीवर भर ऊन्हात आम्ही गरमीने वैतागलेलो असतांना त्या पाईप-लाईनमधून आमच्या अंगावर पाण्याचे थंड तुषार ऊडले...... अहा...हा....! किती थंडगार वाटलं होतं तेव्हा....! पुन्हा तिथं जाऊन भिजावं वाटत होतं. पण "त्या" करिज्माचा अजुन पत्ताच नव्हता, कुठं हरवले होते कोणास ठाऊक..? तेव्हा आम्ही विचार केला की त्यांना पाहायला मागे जावे, तेव्हाच ते आम्हाला दिसले, लगेच आम्हाला गाडी फिरवावी लागली. थोड्याच वेळात घाट लागला, एकदम सामसूम रस्ता, भरदिवसा......! घाटातून जातांना मस्त मजा वाटत होती. शेवटी १० मिनीटांत आम्ही पद्मालयला पोहोचलो. तेथे गेल्यावर आम्ही गाडी पार्क केल्या अन मंदिराची वाट धरली. त्या दिवशी मंगळवार होता. तेथे दर संकष्ट चतुर्थीला गर्दी असते. अन त्या दिवशी बहुतेक संकष्ट चतुर्थी असावी, त्यामुळेच तिथे गर्दी असावी. जाऊ द्या, मंदिराचा परिसर एकदम भव्य आहे. तसेच शेजारी एक मोठा तलाव आहे, तसे मी फोटो काढले आहेतचं. बाजुच्या चित्रात त्या तलावाचा फोटो बघा.
अरे हो, मला अन गौरवला अजुन कोणीच सांगितलं नव्हतं की, पद्मालयला नेमकं कशाचं मंदिर आहे म्हणून...! तसं आम्ही बर्याच वेळा भाऊजींना विचारलं पण त्यांनी सांगायच टाळलं. शेवटी मंदिरात गेल्यानंतरच कळालं की ते कशाचं होतं.....! तेथे दोन गणपती आहेत, डाव्या सोंडेचा अन उजव्या सोंडेचा... त्याबद्दल तेथे एका बोर्डवर लिहिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे:
श्री गणेश पुराणातील उपासना खंडातील ७३, ७४, व ९०, ९१ अध्यायात श्री क्षेत्र पद्मालय संस्थानातील स्वयंभू गणेश मूर्तीचा उल्लेख आढळतो. साडेतीन सिध्दी विनायका(पिठा) पैकी श्री क्षेत्र पद्मालय पूर्ण पिठ आहे. यात मोरगांव, राजूर, पद्मालय व अर्धपिठ चिंचवड असा उल्लेख आढळतो.
उजव्या सोंडेचा गणपती:- परशुराम अवताराच्या काळात या प्रदेशात कृतविर्य नावाचा राजा होवून गेला त्याला मुल नव्हते. तो गुरूदत्ताचा भक्त होता. श्री दत्तांनी संकट चतुर्थीचे व्रत पुत्र प्राप्तीसाठी करण्यास सांगितले. एका चतुर्थीस कृतविर्य पुजा करीत असतांना त्याला जांभई आली त्यावेळी त्याने आचमन न करता पुजा विधी तसाच सुरू ठेवला. या चुकीमुळे राणीला हात-पाय नसलेला मुलगा झाला. त्याचे नाव कार्तविर्य ठेविले. त्या मुलाला १२ वर्षे सांभाळले वरील गुरूंनी त्या कार्तविर्याला गणेशाचा बिजमंत्राचा जप करण्यास सांगीतले. याच तलावासमोर बसून कार्तविर्याने तपश्चर्या केली व याच तलावातून प्रवाळयुक्त गजाननांनी कार्तविर्याला स्पर्श केल्यावर त्याला सहस्त्र हात व दोन पाय तयार झाले. त्याचे नाव सहस्त्र अर्जून ठेविले. व त्यांनी सहस्त्र हातांनी त्या श्रींना येथेच थांबण्याची विनंती केली. विनंतीला मान देऊन उजव्या सोंडेचे श्री गणपती त्याच स्थितीत येथे थांबलेले आहेत.
डाव्या सोंडेचा गणपती:- समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष शंकरांनी प्राशन केल्यावर त्यांच्या शरीराची आग होवू लागली त्यावेळी गळ्यात शेष नागाला धारण केले, त्यामुळे महादेवाच्या शरीराची आग शांत झाली. परंतु शेष नागास गर्व झाला माझ्या सानिध्यामुळे महादेवांना बरे वाटू लागले, महादेवांना हे समजले. त्यांनी शेषांना जमिनीवर फेकले. त्यावेळी शेष पद्मालय क्षेत्री येऊन पडले. शेष नाग दु:खाने फुस्कारू लागला तो आवाज ऐकून नारदमुनी त्यांच्या जवळ आले व पंचाक्षरी गणेशाचा मंत्र दिला. त्यांच्या तपोबळाने १२ वर्षानंतर डाव्या सोंडेच्या आकारात प्रवाळयुक्त गजाननांनी त्या शेष नागाला दर्शन दिले व त्याला धरतीचा भार चांगल्या रितीने सांभाळता यावा अशी शक्ती दिली. व आपल्या पिताश्रींना (महादेवांना) पुन्हा शेषाला गळ्यात धारण करण्यास विनंती केली. माझी मनोकामना जशी पुर्ण केली तसेच येथे येणार्या भक्तांची मनोकामना पुर्ण करण्यासाठी आपण येथे थांबावे अशी विनंती शेषनागाने केली. शेष नागाच्या विनंतीला मान देवून आजही डाव्या सोंडेचे गणपती पद्मालय येथे वास्तव्य करून आहेत.

पद्मालय येथे काढलेले फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा.
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा
»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.
मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!
लिहिण्या आगोदर, मराठी लिखाण चालु - बंद करा!
टिप्पणी देण्यासाठी, वरती लिहिलेले लिखाण खालच्या बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा.